मराठमोळ्या अनिता डोंगरे प्रथमच यादीत
भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वोच्चपदी महिला असण्याची परंपरा कायम आहे. अशाच आघाडीच्या महिलांना आपल्या यादीत स्थान देण्याचे कार्य यंदा फॉच्र्युन या नियतकालिकाने केले आहे. देशातील आघाडीच्या ५० उद्यमशील महिला निवडताना फॉच्र्युनने भारतीय ‘बिझिनेस वुमेन’च्या यादीत चंदा कोचर यांना वरच्या स्थानावर नेऊन ठेवताना सलग तिसऱ्यांदा हा प्रयत्न केला आहे. ५१ वर्षीय चंदा कोचर या देशातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
पाठोपाठ याच बँकेच्या पूर्वाश्रमीच्या व अ‍ॅक्सिस बँकेच्या विद्यमान शिखा शर्मा यांना क्रम देण्यात आला आहे. यादीत मराठमोळ्या अनिता डोंगरे यांचा नव्याने प्रवेश झाला आहे. तर मालिका व चित्रपट निर्माती एकता कपूर यांनाही या क्रमवारीत स्थान मिळाले आहे.
वित्तीय क्षेत्रासह माहिती तंत्रज्ञान, रुग्णालय, वाहन, माध्यम, औषधनिर्मिती, विधी, ग्राहकपयोगी वस्तू या क्षेत्रातील सर्वोच्चपदी असणाऱ्या महिलांनाही फॉच्र्युनच्या ‘टॉप ५०’ यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
प्रथमच यादीत स्थान मिळविणाऱ्यांमध्ये एल अ‍ॅण्ड टी अन्व्हेस्टमेन्ट मॅनेजमेन्टच्या आशु सुयश व टाटा स्टारबक्स इंडियाच्या अवनी दावडा यांचाही समावेश आहे.