डॉ. रेड्डीज् लेबोरेटरीज्चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. के. अंजी रेड्डी यांचे शुक्रवारी सायंकाळी  हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात यकृताच्या कर्करोगाने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी समयराज्यम, मुलगी अनुराधा, जावई जी. व्ही. प्रसाद आणि मुलगा के. सतिश रेड्डी असा परिवार आहे.
डॉ. रेड्डीज् लेबोरेटरीज ही औषधनिर्मिती कंपनी त्यांनी १९८४ मध्ये स्थापन केली. संशोधन व विकास विभागाची स्थापनाही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली होती.  आजारी असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा कंपनीतील वावर कमी झाला होता. औषधनिर्मिती समूहाची जबाबदारी मुलगा व जावईच हाताळत आहेत. जावई जी. व्ही. प्रसाद हे कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तर मुलगा के. सतिश रेड्डी हे कंपनीचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत.