मुंबई : वार्षिक कामगिरीबाबत सेन्सेक्स व निफ्टी सलग तिसऱ्या वर्षांत निर्देशांक तेजी नोंदविली असली तरी २०१७ च्या तुलनेत तिने किरकोळ वाढ राखली आहे.

गेले संपूर्ण वर्ष भांडवली बाजारावर डॉलरच्या तुलनेतील रुपयाची अस्वस्थता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमतीतील कमालीची हालचाल नोंदली गेली आहे.

२०१८ मध्ये सेन्सेक्स २,०११ अंशांनी वाढला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ३.२ आहे. तुलनेत आधीच्या, २०१७ मध्ये मुंबई निर्देशांक २८ टक्क्य़ांनी झेपावला होता. तर तत्पूर्वीच्या, २०१६ मध्येही तो ३ टक्यांनी पुढे गेला होता. मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मूल्य गेल्या वर्षभरात ७.२५ लाख कोटींनी रोडावले.

गेल्या वर्षांत निफ्टी ३२२ अंश म्हणजेच ३.२ टक्क्य़ांनी वाढला. तर २०१७ मध्ये तो थेट २८.६५ टक्क्य़ांनी उंचावला होता. त्याआधी, २०१६ मध्ये त्यात २०१५ च्या तुलनेत ३ टक्के भर पडली होती. यंदा वार्षिक तुलनेत दोन्ही निर्देशांकात वाढ झाली असली तरी २०१७ पेक्षा ती कमी आहे.

२०१८ मध्ये सेन्सेक्सने ३८,९८९.६५ हा सर्वोच्च टप्पा २९ ऑगस्ट रोजी अनुभवला. तर ३२,४८३.८४ हा त्याचा वर्षांतील किमान स्तर राहिला. वर्षभरातील मुंबई निर्देशांकातील उच्चांकी व नीचांकातील दरी २,९२१.३२ अंशांची नोंदली गेली. २०१९ मध्ये अमेरिका-चीन व्यापार युद्ध, ब्रेग्झिट या आंतरराष्ट्रीय घडामोडींबरोबरच भारतातील मेमधील सार्वत्रिक निवडणुकांचे पडसाद बाजारात उमटण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या भांडवली बाजारात गेल्या वर्षांत स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांकांना मोठा फटका बसला. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे २३.५२ टक्के व १३.३७ टक्क्य़ांसह घसरले. यापूर्वीच्या दोन्ही वर्षांत हे दोन्ही निर्देशांक वार्षिक तुलनेत वाढले होते. या वर्षांत मिड कॅप ९ जानेवारी रोजी सर्वोच्च तर ९ ऑक्टोबर रोजी नीचांक स्तरावर होता. स्मॉल कॅपचाही वर्षउच्चांकी व नीचांकी प्रवास अनुक्रमे १५ जानेवारी व ९ ऑक्टोबर रोजी नोंदला गेला.

वर्षअखेर मात्र भांडवली बाजार संमिश्र

वर्ष २०१८ ची अखेर करताना भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक शेवटच्या सत्रात संमिश्र हालचाल नोंदविणारे ठरले. चालू वर्षांचा शेवटच्या व नव्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण तर निफ्टीत नाममात्र वाढ झाली.

८.३९ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक ३६,०६८.३३ वर थांबला. तर २.६० अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १०,८६२.५० वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांमध्ये प्रत्येकी ०.०२ टक्के अनुक्रमे घट व वाढ झाली.

२०१८ च्या अखेरच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज ७.१० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह सेन्सेक्समध्ये अग्रेसर राहिली. तर जवळपास त्याच बाजारमूल्यासह टाटा समूहातील टीसीएस याबाबत दुसऱ्या स्थानावर राहिली.

एचडीएफसी बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, आयटीसी या तीन कंपन्यांही बाजार भांडवलाबाबत पहिल्या पाचमध्ये राहिल्या.

सोमवारच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत पुन्हा ७० खाली घसरणाऱ्या रुपयाची चिंता उमटली.

मुंबई शेअर बाजारातील प्रमुख सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये सन फार्मा, बजाज फायनान्स, वेदांता, येस बँक, टाटा मोटर्स, एचसीएल टेक्नॉलॉजिज्, इंडसइंड बँक, कोटक महिंद्र बँक, इन्फोसिस, बजाज ऑटो आदी सर्वाधिक मूल्य वाढ नोंदविणारे समभाग ठरले.

आयटीसी, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, टीसीएस, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी लिमिटेड आदींचे मूल्य घसरले. मुंबई निर्देशांकातील निम्मे समभाग घसरणीत राहिले.