29 November 2020

News Flash

जुलैमध्ये आणखी ५० लाख बेरोजगार!

‘सीएमआयई’च्या पाहणीनुसार नोकऱ्या गमावण्याची वेळ सुस्थित पगारदारांवरही

संग्रहित छायाचित्र

 

टाळेबंदीतील शिथिलतेने अनेक उद्योग-व्यवसाय पुन्हा सुरू होऊन, मुख्यत: अनौपचारिक क्षेत्रात रोजगार सुरू झाल्याचे चित्र एकीकडे असताना, दुसरीकडे सुस्थित पगारदार वर्गातील नोकऱ्या गमावण्याचे प्रमाण जुलैमध्ये भीतीदायी ५० लाखांच्या घरात गेले आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)’ या प्रतिष्ठित संस्थेच्या निरीक्षणानुसार, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत एकूण १.८९ कोटी लोकांना उपजीविकेचे साधन गमावावे लागले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीचा घाव पडल्यानंतर, एप्रिल महिन्यात एक कोटी ७७ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या, असे ‘सीएमआयई’कडे उपलब्ध माहिती दर्शविते. मे महिन्यात आणखी लाखभर लोकांचा रोजगार गेला. जूनमध्ये नोकऱ्या गमावणाऱ्यांपेक्षा रोजगार मिळविणाऱ्यांचे प्रमाण ३९ लाखांच्या आसपास होते. तर जुलैमध्ये पुन्हा ५० लाख लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली.

पगारदार कर्मचाऱ्यांवरील गंडांतर हे टाळेबंदी सुरू झाल्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत निरंतर सुरू असून, या काळात उपजीविका गमावलेल्या एकूण एक कोटी ८९ लाख लोकांमध्ये पगारदार कर्मचाऱ्यांचेच प्रमाण लक्षणीय असणे ही अधिक अस्वस्थ करणारी बाब आहे, असे ‘सीएमआयई’ने म्हटले आहे.

पगारदार वर्गाच्या २०१९-२० मधील सरासरी नोकऱ्यांच्या तुलनेत सध्या जवळपास दोन कोटी नोकऱ्यांचे प्रमाण कमी आहे, असे ‘सीएमआयई’चे निरीक्षण सांगते.

मे-जून या महिन्यांत बेरोजगारीसंबंधीचे चित्र सुधारल्याचे जरूर दिसले आहे. परंतु टाळेबंदी सुरू असल्याने लादल्या गेलेल्या अनैच्छिक कामबंदीनंतर उपजीविकेसाठी काही तरी रोजगार मिळविण्याच्या लोकांच्या धडपडीचेच हे द्योतक म्हणता येईल.

गंभीर इशारा कोणता?

पगारदार वर्गात नोकरी एक तर सहज शक्य नाही. शिवाय एकदा गमावलेली नोकरी परत मिळविणे तर त्याहून अवघड आहे. म्हणूनच पगारदार वर्गात बेरोजगारीचा आकडा फुगत जाणे हा चिंतेचा विषय आहे, असा ‘सीएमआयई’ या अहवालाने इशाराच दिला आहे. भारतातील एकूण रोजगारामध्ये केवळ पगारदार वर्गातील नोकऱ्यांचे प्रमाण २१ टक्के इतके आहे. आर्थिक आघाताला सहन करण्याच्या दृष्टीने तुलनेने सक्षम असा हा रोजगार घटक मानला जातो. आज त्या घटकाचीच होत असलेली सर्वाधिक परवड ही भीतीदायी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यातील एकूण रोजगारहानीचा पगारदार वर्गाला १५ टक्क्यांच्या घरात फटका बसला आहे.

तरुणांचे सर्वाधिक नुकसान

करोना कहराने भारतात बांधकाम आणि शेतीसंलग्न क्षेत्रातून सर्वाधिक रोजगारावर गदा आली असून, तब्बल ४१ लाख तरुणांची (१५ ते २४ वयोगटातील) उपजीविका हिरावली गेली, असे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (आयएलओ) आणि आशियाई विकास बँक (एडीबी)ने संयुक्तपणे केलेली पाहणी सांगते. प्रौढ (२५ वर्षे वयापुढील) व अनुभवी कामगारांपेक्षा करोना आजारसाथीचा तरुण नोकरदारांना सर्वाधिक फटका बसल्याचा या पाहणीचा कयास आहे. टाळेबंदीच्या काळात भारतातील दोनतृतीयांश कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी (अ‍ॅप्रेंटिस) उमेदवार घेणे बंद झाले, तर तीनचतुर्थाश कंपन्यात अंतर्वासिता पद्धती (इंटर्नशिप) पूर्णपणे बंद झाल्याचे या पाहणीचे निरीक्षण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2020 12:12 am

Web Title: another 5 million unemployed in july abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘सेन्सेक्स’ची ४७७ अंशांनी झेप
2 तिमाहीत अर्थव्यवस्थेत १६.५ टक्क्यांनी घसरण
3 उद्यमशील, उद्य‘मी’ : कर्मसिद्धांत आणि उद्योजक
Just Now!
X