कार घ्यायचीय? आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला अमूक वर्षांपर्यंत मोफत सíव्हसिंग देऊ, जुनी कार आणलीत तर उत्तमच.. तुम्हाला अमूक हजारापर्यंत सूट देऊ.. तुम्ही आमची कार आत्ता बुक तर करा, आणि लगेचच सिंगापूरला जाणाऱ्या विमानात बसा.. अशा विविध योजनांचा वर्षांव करत कार कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षति करण्याचा धडाका सध्या लावला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या किंमती आणि घसरत असलेला रुपया या पाश्र्वभूमीवर खपात प्रचंड घसरण झालेल्या वाहननिर्मात्या कंपन्यांनी विविध योजनांचा धडाका लावला आहे. ‘मान्सून ऑफर’ या नावाखाली या योजनांचा पाऊस पाडला जात आहे, हे विशेष.
गेल्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ आणि केंद्र सरकारने लादलेले विविध कर यांच्या कचाटय़ात सापडलेल्या वाहननिर्मिती क्षेत्राने सहामाहीत प्रचंड घसरण अनुभवली आहे. या घसरणीला केंद्राचे धोरणच जबाबदार असल्याचे या क्षेत्रातील धुरिणांचे म्हणणे आहे. मात्र, असे असले तरी उद्योग तगवण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहकांनी आपल्याकडे यावे यासाठी आता या क्षेत्राने स्वतहून पुढाकार घेत विविध आकर्षक योजनांचा धडाका लावला आहे. यात स्मॉल कार सेगमेंटपासून ते लक्झरी आणि एसयूव्ही कार सेगमेंट या सर्वाचाच समावेश आहे.
काय काय सवलती..?
कमी मागणीमुळे आपला कारखाना काही दिवस बंद ठेवण्याची नामुष्की ओढवलेल्या मारूती-सुझुकीने कोणतीही कार घेऊन या आणि मारूती सुझुकीची कोणतीही नवीन कार घेऊन जा अशी एक्स्चेंज ऑफर देऊ केली. एर्टगिा, वॅगन आर आणि स्विफ्ट या गाडय़ांवर ही ऑफर देण्यात आली होती.
ह्युंडाईने तर आय२० गाडी बुक केल्यास ‘दोघांसाठी सिंगापूरच्या सहलीचे तिकीटी जिंका’ अशी ऑफर दिली आहे. फोक्सवॅगनने पोलो गाडीच्या खरेदीवर तीन वर्षांपर्यंतचा मोफत विमा, तीन वर्षांपर्यंतची देखभाल मोफत, रोडसाइड असिस्टन्स आणि २० हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस देऊ केला आहे.
फोर्ड फिगोने नव्या एडिशनवर सरकारी कर्मचारी, डॉक्टर, सीए, संरक्षण दलातील कर्मचारी यांच्यासाठी विशेष ऑफर देऊ केल्या आहेत.
याचबरोबर मिहद्रा, टोयोटा, टाटा, शेव्हरोलेट, बीएमडब्ल्यू, स्कोडा आदी कंपन्यांनीही विविध ऑफर्स देऊ करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षति करण्याचा प्रयत्न केला आहे.
मान्सूनबरोबरच कमी वाहन विक्रीची चाहूल लागल्याने वाहन उत्पादक कंपन्यांकडून सूट-सवलतींचा बार उडवून देण्याची प्रथा आहे. यंदा मात्र एकूणच संथ अर्थगतीमुळे कंपन्यांना त्यांच्या सवलती, योजनांवरचा मारा अधिक तीव्र करावा लागला आहे. प्रत्यक्षात याचा मोठा परिणाम गेल्या महिन्यात तरी दिसला नाही.

संघटना काय म्हणतात?
वाहन क्षेत्राला सवलतीतील किमतीची लाभनिर्मित कंपन्यांकडून नेहमीच दिला जातो. यंदाच्या कमी मागणीच्या कालावधीतही तो आहेच. ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सण-समारंभातही हेच दिसून येईल. मात्र या क्षेत्राला खऱ्या अर्थाने विक्री वाढीचा हातभार लागायचा असेल तर आता सरकारकडून अधिक सहकार्याचे पॅकेज जाहीर व्हावे.
* एस. शांडिल्य,
महासंचालक, सीआम (वाहन उत्पादक संघटना)

गेल्या काही दिवसांपासून वाहन विक्री मंदावली आहे. त्यासाठी वाहनांच्या खरेदीवर सूट-सवलती देण्याचे धोरण अनेक कंपन्यांकडून अवलंबिले गेले आहे. वाहन खरेदीच्या दृष्टीने आगामी सणांचा कालावधी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. शिवाय सवलतीच्या दरातील विक्रीची जोड मिळाल्याने या क्षेत्रासाठी येता कालावधी सकारात्मक नोंदला जाईल, अशी अपेक्षा आहे.
* संदीपकुमार बाफना,
अध्यक्ष, महाराष्ट्र ऑटो डीलर्स असोसिएशन