देशातील गरजूंना स्वच्छ इंधन मिळण्यासाठी श्रीमंत उद्योजकांनी गॅस अनुदान स्वेच्छेने परत करण्याचे आवाहन गुरुवारी भारतीय औद्योगिक महासंघाच्या व्यासपीठावर करण्यात आले. इंधन विक्री व विपणन क्षेत्रातील आघाडीच्या सार्वजनिक भारत पेट्रोलियममार्फत हे आवाहन करण्यात आले व त्याला उपस्थित उद्योजकांकडून स्वाक्षरी मोहिमेच्या रुपात प्रतिसादही देण्यात आला.
महासंघाच्या (सीआयआय) मुंबईत झालेल्या राष्ट्रीय परिषदेत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. वरदराजन यांनी याबाबतचे आवाहन आपल्या भाषणात केले. यानंतर ‘द गिव्ह इट अप’ नावाने सुरू करण्यात येत असलेल्या याबाबतच्या मोहिमेंतर्गत प्रोत्साहन देण्याचे आश्वासन महासंघाचे अध्यक्ष सुमित मझुमदार यांनीही केले. अशा प्रोत्साहनपूरक योजनांमध्ये महासंघ सरकारबरोबर कार्य करेल, असेही मझुमदार म्हणाले.
देशातील १३ कोटी घरटय़ांना स्वच्छ ऊर्जा मिळत नसल्याचे नमूद करत आतापर्यंत ६.५ लाख ग्राहकांनी कंपनीला अनुदान परत केल्याने ३०० कोटी रुपयांची बचत झाल्याचे वरदराजन यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर २०१४ पासून सुरू झालेल्या सरकारच्या ‘पहल’ योजनेंतर्गत देशभरातील ६७६ जिल्ह्य़ांमध्ये १५ कोटी ग्राहक अनुधानाचा लाभ घेत आहेत.