अ‍ॅपल कंपनीच्या आयफोन ६ एस आणि ६ एस प्लस या स्मार्टफोन मॉडेलच्या भारतातील किंमतीत दहा टक्क्य़ांहून अधिक घट झाली आहे. अ‍ॅपलतर्फे अधिकृतरीत्या किंमती कमी झाल्याचे जाहीर केले गेले नसले तरी ऑनलाइन विक्री करणाऱ्या काही संकेतस्थळांवर या फोनच्या किंमती कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यात इन्फिबिम, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल, पेटीएम या संकेतस्थळांवर आयफोनच्या किंमतीत घट झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर सणासुदीचा हंगाम संपल्याने या स्मार्टफोनच्या मागणीत घट झाल्याने किंमती कमी केल्या गेल्या आहेत.
इन्फिबिम या संकेतस्थळावर केवळ आयफोन ६ एसच्या १६ जीबी क्षमतेच्या फोनवर सवलत उपलब्ध आहे. त्याची किंमत ५१,९९९ रुपये असून किंमतीतील ही घट साधारण ११ टक्के आहे. फ्लिपकार्टवर ६ एसच्या १६ जीबी फोनची किंमत ४८,४९९ रुपयांपासून सुरू होत आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ६२,००० रुपये होती. त्या मानाने ही लक्षणीय घट आहे. फ्लिपकार्टवर आयफोन ६ एसच्या ६४ जीबी आणि १२८ जीबी फोनची किंमत अनुक्रमे ६१,९९९ रुपये आणि ७४,९४० रुपये आहे. अशाच प्रकारे अ‍ॅमेझॉन,स्नॅपडिल, पेटीएम या संकेतस्थळांवर आयफोनच्या किंमतीत घट झाल्याचे दिसून येत आहे.
अन्य देशांच्या तुलनेत भारतात या स्मार्टफोनच्या किंमती अधिक होत्या. आता रुपया व डॉलरच्या विनिमय दरांत बदल झाल्याने किंमतीतही बदल झाल्याचे सांगितले जात आहे.