महसूल आणि नफ्यात विक्रमी वाढ

नवी दिल्ली : अ‍ॅपल आयफोनने भारतात विक्रीबाबत डिसेंबर २०१९ अखेरच्या तिमाहीत दुहेरी अंकातील वृद्धी नोंदली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या आयपॅडलाही या कालावधीत भारतातून वाढती मागणी राहिली आहे. कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीतील कुपेरशिनोस्थित अ‍ॅपलचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्री हिस्सा ६१ टक्के आहे.

सरलेल्या तिमाहीत कंपनीने स्थापनेपासून सर्वाधिक, ९१.८ अब्ज डॉलरच्या जागतिक महसुलाची नोंद केली असूून वार्षिक तुलनेत त्यात ९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने या तिमाहीत २२ अब्ज डॉलरचा कमावलेला नफाही विक्रमी आहे.

अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये दुहेरी अंकातील विक्री वाढ नोंदविली असल्याचे अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी सांगितले. त्याचबरोबर फ्रान्स, सिंगापूर तसेच ब्राझील, चीन, भारत, थायलॅण्ड, तुर्कस्थान अशा विकसनशील देशांमधूनही कंपनीच्या उत्पादनांना मागणी राहिल्याचेही ते म्हणाले.

अ‍ॅपलला आयफोनच्या माध्यमातून तिमाहीत मिळालेल्या महसुलात ८ टक्के वाढ होऊन तो ५६ अब्ज डॉलर झाला आहे. कंपनीच्या आयफोन ११, आयफोन ११ प्रो, आयफोन ११ प्रो मॅक्ससारख्या फोनना मिळालेल्या ग्राहकांच्या प्रतिसादामुळे या उत्पादन गटातील महसूल वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अ‍ॅपलच्या आयपॅडबाबत कूक यांनी सांगितले की, भारतासह मॅक्सिको, टर्की, पोलंड, थायलॅण्ड, मलेशिया, फिलिपाइन्स, व्हिएतनामसारख्या विकसित देशांमधून या उत्पादनासाठी वाढती मागणी नोंदली गेली. मॅक (कॉम्प्युटर) आणि आयपॅडद्वारे अ‍ॅपलने गेल्या तिमाहीत अनुक्रमे ७.२ अब्ज डॉलर व ६ अब्ज डॉलर महसूल मिळविला आहे.

भारतातील उत्पादन  केंद्र निर्यातप्रवण

अ‍ॅपलने गेल्या व र्षी भारतातून आयफोन एक्सआरची निर्मिती सुरू केली. भारतीय बाजारपेठ तसेच निर्यातीकरिता कंपनीने येथील उत्पादन केंद्राची निवड केली आहे. अ‍ॅपलची भागीदार कंपनी सेलकॉम्पदेखील नोकिआचा चेन्नईतील प्रकल्प ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत आहे. मार्च २०२० पासून तेथे फोन चार्जर तसेच अन्य उपकरणांची निर्मिती केली जाईल.