करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. अनेक उद्योगांना आणि कंपन्यांना त्याची झळ बसली होती. दरम्यान, Apple या कंपनीलाही लॉकडाउनचा मोठा फटका बसला असून आयफोनच्या विक्रीतही मोठी घट झाली होती. असं असलं तरी संप्टेंबर तिमाहित मात्र कंपनीनं विक्रमी कमाई केली आहे. कंपनीच्या विक्रमी कमाईमागे भारतीय बाजारपेठेचं मोठं योगदान असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय बाजारपेठेचा Apple ला मोठा फायदा झाला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत आयफोनची जागतिक स्तरावरील विक्रीत २०.७ टक्क्यांची घट झाली.

“आम्ही अमेरिका, युरोप आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रात विक्रम केला आहे. विशेषत: भारतीय बाजारपेठेत आमचे काही ऑनलाइन स्टोअर सुरू झाले आहेत,” असं Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक म्हणाले. सप्टेंबर महिन्यात Apple नं भारतात पहिलं ऑनलाइन स्टोअर सुरू केलं होतं.

काही महिन्यांपूर्वी विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉनसारख्या कंपन्यांसोबत करार करून Apple नं भारतात आयफोन ११ चं उत्पादन सुरू केलं होतं. Apple ला केबलचा पुरवठा करणाऱ्या कंपन्याही लवकरच भारतात उत्पादन सुरू करण्याची तयारी करत असल्याचं माध्यमांमधील अहवालातून नमूद करण्यात आलं आहे. २६ सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहित Apple ला ६ हजार ४७० कोटी डॉलर्सचा महसूल मिळाला. करोना महासाथीच्या काळातही कंपनीच्या सर्व नव्या उत्पादनांना उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रतिकूल परिस्थितींचा सामना करतानाही Apple नं सप्टेंबर तिमाहित विक्रम केल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.