बहुचर्चित आणि तंत्रज्ञानात मैलाचा दगड ठरणारा अ‍ॅपलचा आयफोन ६ भारतात उपलब्ध होण्याची गुरुवार रात्रीची वेळ नजीक येऊन ठेपली असली तरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र उत्सुक खरेदीदारांना शुक्रवारी सकाळी दालने खुली झाल्यावरच घेता येणार आहे. त्यामुळे अमेरिका, चीनसारख्या ठिकाणी मध्यरात्री रांगेत उभे राहून फोन खरेदी केल्यानंतरचा ‘सेल्फी’ आनंद भारतात तरी दिसण्याची शक्यता कमीच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महिन्यापूर्वी तर संकेतस्थळाच्या माध्यमातून आठवडय़ापूर्वी नोंदणी सुरू झालेला आयफोन ६ आणि ६ प्लस मोबाइल गुरुवारी मध्यरात्री निवडक दालनांमध्ये उपलब्ध होत आहे. त्याच्या सादरीकरणाचा मुहूर्त मध्यरात्री साधण्यात आला असला तरी प्रत्यक्षात हा फोन सकाळी नियमित वेळेत दालने खुली झाल्यानंतरच खरेदी करता येणार आहेत. सध्या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी सुरू असलेला मोबाइल खरेदीदारांच्या हातातही दोन दिवसांनंतरच पडणार आहे.
यापूर्वी एअरटेलने आयफोन ४चे मध्यरात्री अनावरण केले होते. त्या वेळेस ज्यांनी पूर्व नोंदणी केली होती त्यांना मध्यरात्री फोन देण्यात आले होते. संकेतस्थळ व दालन नोंदणीनंतर प्रत्यक्षात हा मोबाइल दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांच्या हातात येणार आहे. संकेतस्थळा व्यतिरिक्त देशभरातील २४ शहरांमधील क्रोमा आणि विजय सेल्ससारख्या १,२०० दालनांमधून हा फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.