भांडवली बाजार नियामक सेबीने ‘फ्लेक्झी कॅप’ या नवीन फंड गटाची निर्मिती करण्यास फंड घराण्यांना मान्यता दिली आहे. या फंड गटातील फंडांना त्यांच्या मालमत्तेपैकी किमान ६५% मालमत्ता समभाग आणि समभाग संलग्न साधनात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तथापि, लार्ज-मिड-किंवा स्मॉल-कॅप समभागांच्या प्रमाणावर कोणतेही बंधन घातलेले नाही.

सप्टेंबरमध्ये सेबीने मल्टी-कॅप फंडांच्या मालमत्ता विभागणीच्या नवीन नियमांना मंजुरी दिली होती. या नियमांनुसार, मल्टी कॅप फंडांना किमान २५ टक्के प्रत्येकी लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभाग गुंतवणूक करण्याची सक्ती केली होती.

या नियमामुळे फंड उद्योगांमध्ये विद्यमान मल्टी कॅप फंडांना म्युच्युअल मोठय़ा मंथनाला सामोरे जावे लागणार होते. सध्या बहुसंख्य मल्टी कॅप फंडांतील गुंतवणूक लार्ज कॅप केंद्रित आहेत. त्यांना मिड आणि स्मॉल कॅप सक्तीने खरेदी करणे भाग पडले असते. या परिपत्रकाबद्दल म्युच्युअल फंड संघटना ‘अ‍ॅम्फी’ने नियामकांना या परिपत्रकाचा फेरविचार करण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार, नवीन ‘फ्लेक्झी कॅप’ फंड गट तयार करण्यात आला आहे. या नवीन परिपत्रकामुळे सध्याच्या मल्टी कॅप फंडांना ‘फ्लेक्झी कॅप’ गटात परिवर्तीत करण्याची आता मुभा देण्यात आली आहे.

विद्यमान योजनेला ‘फ्लेक्झी कॅप’मध्ये रूपांतरित करणे हा फंड घराण्यांसाठी पर्याय खूप चांगला आहे. यामुळे गुंतवणुकीतील अनावश्यक खरेदी – विक्री टळली आहे.

– कृष्णा कारवा,    वरिष्ठ विश्लेषक,    आय फास्ट फायनान्शियल.

पूर्वीच्या मल्टी कॅप प्रकारात समान लवचिकता होती. आता ती या नवीन फंड प्रकारात नाही. हायब्रीड इक्विटी आणि ‘फ्लेक्झी कॅप’ या फंड प्रकारात फार फरक नसून फंड घराण्यांना सध्याची मालमत्ता राखण्यात आणि नवीन फंड विक्रीच्या माध्यमातून मालमत्ता जमा करण्यास संधी उपलब्ध झाली आहे. या नवीन फंड प्रकारामुळे गुंतवणूकदारांच्या गोंधळात अधिक भर पडेल. नव्या परिपत्रकाऐवजी आधीचे परिपत्रक मागे घेणे अधिक योग्य झाले असते.

– विद्या बाला, सह संस्थापक, प्राइम इन्व्हेस्टर.