15 August 2020

News Flash

एप्रिलपासून ठेव विम्यापोटी बँकांना २,४०० कोटींचा अतिरिक्त भुर्दंड

वर्ष १९६८ मध्ये फक्त ५,००० रुपयांच्या ठेवींना विमाछत्र होते.

मुंबई : बँकांच्या ठेवींवरील विमाछत्र एक लाखांवरून पाच लाखांपर्यंत विस्तारल्यानंतर त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या विमा हप्त्याची रक्कम नव्या वित्त वर्षांपासून वाढणार असून वाढत्या थकीत कर्जाचा सामना करणाऱ्या बँकांना परिणामी २,४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. वाढीव खर्चामुळे बँका ग्राहकांना देत असलेल्या विविध बँकिंग सुविधा महाग करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बँकांमधील ठेवींवरील रकमेकरिता विमाछत्र पुरविले जाते. रिझव्‍‌र्ह बँकेची उपकंपनी असलेल्या ठेव विमा व पत हमी महामंडळ (डीआयसीजीसी) मार्फत ही व्यवस्था सत्तरीच्या दशकापासून अस्तित्वात आहे. महामंडळ कायदा, १९६१ च्या कलम १६ (१) अन्वये बँकांमधील ठेवींमधील रकमेला विम्याचे छत्र आहे.

वर्ष १९६८ मध्ये फक्त ५,००० रुपयांच्या ठेवींना विमाछत्र होते. ते मे १९९३ मध्ये एक लाख रुपये करण्यात आले होते. संसदेत गेल्याच आठवडय़ात सादर झालेल्या २०२०-२१ वित्त वर्षांसाठीच्या अर्थसंकल्पात ही रक्कम ५ लाख रुपये करण्यात आली. अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या ठेवींमधील रकमेवरील विमा छत्राची मात्रा ४ फेब्रुवारीपासूनच अमलात आली आहे.

महामंडळाच्या परिपत्रकानुसार, विम्यापोटी आकारला जाणारा प्रति १०० रुपयांमागील १० पैसे हा दर तूर्त कायम राहणार आहे; मात्र येत्या १ एप्रिलपासून तो प्रति १०० रुपये ठेवींमागे १२ पैसे होणार आहे. २००५ पूर्वी बँकांना १०० रुपयांवर ८ पैसे विमा हप्ता भरावा लागत असे. महामंडळ अस्तित्वात आले तेव्हा – १९६२ मध्ये १०० रुपयांमागे ५ पैसे विमा हप्ता होता. महामंडळाला १५ पैसे प्रति १०० रुपयांपर्यंतच विमा हप्ता वाढविता येतो.

बँकांमधील ठेवीदारांचे विमा संरक्षण हाताळणाऱ्या महामंडळाला २०१८-१९ या वित्त वर्षांत १८,१४७ कोटी रुपयांचा नफा व त्यावर ७,२१६ कोटी रुपयांचा प्राप्तिकर भरला होता. महामंडळाने मार्च २०१९ अखेर १२,०४३ कोटी रुपये विमा हप्ता व ७,२४५ कोटी रुपये विविध गुंतवणुकीच्या माध्यमातून कमावले आहेत. बँकांनी महामंडळाकडे २०१७-१८ मध्ये ११,१२८ कोटी रुपये विमा हप्त्यापोटी भरले होते.

महामंडळाला एकूण १९,२८८ कोटी रुपये उत्पन्नातून अवसायनातील बँकांच्या ठेवींपोटी आजवर १५२ कोटी रुपयेच खर्च करावे लागले असताना केवळ नफा कमावण्याच्या हेतूने विमा हप्त्यावरील प्रमाणात वाढ करणे योग्य नसल्याचे महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी म्हटले आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रात १२० लाख कोटी रुपयांच्या एकूण ठेवी असल्या तरी एक लाख रुपयांपर्यंतच्या विमाछत्राअंतर्गत केवळ ३३ लाख कोटी रुपयांच्या ठेवी असल्याने विमा हप्ता रकमेत वाढ सर्वार्थाने अनावश्यक होती, असेही अनास्कर यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 1:39 am

Web Title: april insure banks extra additional costs akp 94
Next Stories
1 ‘एनएसई’कडून ३० लाख नवगुंतवणूकदारांची भर
2 ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूकस्वारस्य
3 निर्देशांकांच्या सलग दोन सत्रांतील घसरणीला खंड
Just Now!
X