नवी दिल्ली : आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीअखेर देशाची वित्तीय तूट ४.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या एकूण तुटीच्या तुलनेत हे प्रमाण ६१.४ टक्के आहे.

महानिबंधक व लेखापालाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी याच कालावधीत हेच प्रमाण अंदाजित वित्तीय तुटीच्या तुलनेत ६८.७ टक्के होते. सरकारने चालू वर्षांसाठी एकूण वित्तीय तुटीचे लक्ष्य ७.०३ लाख कोटी रुपये निश्चित केले आहे. २०१९-२० वर्षांसाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत वित्तीय तुटीचे प्रमाण ३.३ टक्के ठेवण्याचे लक्ष्य आहे. गेल्या आर्थिक वर्षांत ते ३.४ टक्के असे होते.

वित्तीय तूट ही सरकारच्या उत्पन्न व खर्चाची दरी मानली जाते. एप्रिल ते जून २०१९ दरम्यान सरकारला अर्थसंकल्पात अंदाजण्यात आलेल्या रकमेपैकी १४.४ टक्के (२.८४ लाख कोटी रुपये) उत्पन्न झाले. तर खर्च ७.२१ लाख कोटी रुपये आहे.

चालू वर्षांत सरकारचे १९.७७ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न आणि  २७.८४ लाख कोटी रुपये खर्च अंदाजला असून. दोहोतील तफावत ७.०३ लाख कोटी रुपये वित्तीय तुटीचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे.