एकसदस्यीय लवादापुढे गेल्या आठवडय़ात अ‍ॅमेझॉनच्या फ्यूचर समूहाविरोधातील दाव्यावर सुनावणी झाली आणि काही दिवसांतच या प्रकरणी निवाडाही येईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेची ई-व्यापार क्षेत्रातील महाकाय कंपनी अ‍ॅमेझॉन डॉट कॉमने फ्यूचर समूहावर कराराच्या उल्लंघनाचा आरोप करून, कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजशी २४,७१३ कोटी रुपयांच्या व्यवसाय विक्रीचा व्यवहार करून फ्यूचर समूहाने केला. पण त्यातून आधी अमेरिकी कंपनीबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन झाल्याचे हे प्रकरण आहे. सिंगापूरचे निवृत्त अ‍ॅटर्नी जनरल व्ही. के. राजा यांच्या लवाद न्यायाधिकरणापुढे  १६ ऑक्टोबरला सुनावणी झाल्याचे सूत्रांकडून समजते. फ्यूचर समूह हे प्रकरण सामोपचाराने सोडवू इच्छित असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र शुक्रवारी सुनावणीच्या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी फ्यूचर समूहाचे प्रतिनिधित्व केले असल्याचे समजते.