मुंबई : सुमारे ४५,००० कोटी रुपयांचा कर्जभार असलेल्या एस्सार स्टीलवर अखेर लंडनच्या अर्सेलरमित्तलला ताबा मिळाला आहे. एल. एन. मित्तल यांच्या जगातील अव्वल या कंपनीने हा व्यवहार ५०,००० कोटी रुपयांहून अधिक प्रमाणात केला आहे. कोटय़वधींचे कर्ज थकविणाऱ्या व नादारी व दिवाळखोरी संहितेंर्गत कारवाई करावयाच्या रिझव्र्ह बँकेच्या पहिल्या १२ कंपन्यांमध्ये एस्सार स्टीलचा समावेश होता. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादामार्फत पार पडलेल्या निविदा प्रक्रिये दरम्यान सर्वोच्च बोली लावलेल्या अर्सेलरमित्तलकडे अखेर एस्सार स्टीलचा ताबा देण्याचा निर्णय कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीने बहुमताने घेतला. अर्सेलरमित्तलची वार्षिक स्टील उत्पादनक्षमता ९७ दशलक्ष टन आहे. एस्सार स्टीलकरिता तिची न्युमेटल मॉरिशसबरोबरही स्पर्धा होती. एस्सार खरेदीकरिता अर्सेलरमित्तलने अन्य दोन कंपन्यांची देणी (७,५०० कोटी रुपये) पूर्ण करण्याची लवादाची अट अर्सेलरमित्तलने पूर्ण केली होती. एस्सार स्टीलच्या खरेदीनंतर स्टील उत्पादन वाढविण्यासह तिला नफ्यात आणण्याचा दावा अर्सेलरमित्तलने केला आहे. एस्सार स्टीलकरिता अर्सेलरमित्तल अतिरिक्त २,००० ते २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. अर्सेलरमित्तलच्या एस्सार स्टीलवरील अधिग्रहणामुळे रशियाची व्हीटीबी बँक तसेच भारतातील वेदांता समूह स्पर्धेबाहेर पडला आहे.