कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या अहमदाबाद पीठाचा हिरवा कंदील

नवी दिल्ली : सुमारे ४९,००० कोटी रुपयांचे कर्ज थकविलेल्या एस्सार स्टीलच्या खरेदीसाठीचा अर्सेलरमित्तलचा दावा अखेर राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने मान्य केला आहे. नऊ महिन्यानंतर न्यायाधिकरणाच्या अहमदाबाद खंडपीठाने याबाबतच्या निर्णयावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.

नादारी आणि दिवाळखोर सिहतेंतर्गत थकीत कर्जतिढा सोडविण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने एस्सार स्टीलसह १२ बडी कंपनी खाती जून २०१७ मध्ये निश्चित केली होती. ही प्रक्रिया राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मंचावर पार पाडण्याकरिता स्टेट बँक आणि स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेने पुढाकार घेतला होता.

मात्र एस्सार स्टीलचे मुख्य प्रवर्तक रुईया कुटुंबांकडून यात हस्तक्षेप घेतला गेला. थकीत रक्कम भरण्यासाठी एस्सार स्टीलने काही महिन्यांपूर्वीच निधी उभारणी केल्याचेही जाहीर केले होते. एकूण ५४,३८९ कोटी रुपये उभारणीचा एस्सार स्टीलचा प्रस्ताव होता. विविध बँकांचे कर्ज व व्याज मिळून एकूण रक्कम ४९,००० कोटी रुपये झाली होती. पैकी अर्सेलरमित्तलने ४२,००० कोटी रुपये बँकांकडे भरण्याची तयारी एस्सार स्टीलकरिता गेल्या ऑक्टोबरमध्ये बोली लावताना दाखविली. राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणामार्फत हा तिढा सुटला असला तरी एस्सार स्टीलला कर्ज देणाऱ्या बँकांना १४ टक्के रकमेवर पाणी सोडावे लागले आहे. शिवाय ही प्रकिया २७० दिवसांमध्ये पार पाडण्याऐवजी तिला ५८३ दिवस लागले आहेत.

एस्सार स्टीलच्या गुजरातमधील प्रकल्पाची वार्षिक एक कोटी टन उत्पादनक्षमता आहे. कंपनीच्या प्रकल्पासाठी अतिरिक्त ८,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची सज्जताही अर्सेलरमित्तलची आहे. एस्सार स्टीलकरिता सुरुवातीला अर्सेलरमित्तलसह रशियाच्या न्युमेटलनेही दावा केला होता. एस्सारच्या रुईयांची स्वतंत्र निविदा तसेच उत्तम गालवामधील अर्सेलरमित्तलची थकीत देणी यामुळे हा तिढा सुटण्यास विलंब लागत होता. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेले होते. या दरम्यान बोली प्रक्रियेत वेदांता समूहही ३५,००० कोटी रुपयांच्या उत्सुकतेसह सहभागी झाला होता.

भूषण स्टीलबाबत निर्णय महिनाअखेर

कर्जभार असलेल्या भूषण पॉवर अ‍ॅण्ड स्टीलच्या संपादनाकरिता जेएसडब्ल्यू स्टीलने केलेल्या दाव्याबाबत ३१ मार्चपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणाने शुक्रवारी दिल्ली पीठाला दिले. ‘भूषण’करिता टाटा स्टीलनेही दावा केला होता. यासाठी टाटा समूहाने १७,००० कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शवली होती. मात्र जेएसडब्ल्यू स्टीलने खरेदी मूल्य ११,००० कोटी रुपयांवरून १८,००० कोटी रुपये असे वाढविले. दरम्यान, ८५४ कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणातील पुंज लॉईडच्या नादारी व दिवाळखोरी प्रक्रियेच्या आयसीआयसीआय बँकेच्या प्रस्तावाला राष्ट्रीय कंपनी  विधि न्यायाधिकरणाने मान्यता दिली. एकूण ६,००० कोटींचे कर्ज थकलेल्या पुंज लॉईडकडून आयसीआयसीआय बँकेला ८५४ कोटी रुपये येणे आहेत.