अर्सेलरमित्तलची ४२,००० कोटींची बोली; कर्जबुडव्या कंपनीकरिता दुसऱ्यांदा प्रक्रिया

नवी दिल्ली : सुमारे ४९,००० कोटी रुपयांचा कर्जभार असलेल्या एस्सार स्टीलच्या खरेदीकरिता झालेल्या दुसऱ्या फेरीअखेर तीन दावेदार समोर आले आहेत. एस्सार स्टीलच्या ताब्याकरिता मुख्य स्पर्धक लंडनची अर्सेलरमित्तल व रशियाची न्युमेटल यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

विविध बँकांचे ४९,००० कोटी रुपयांहून कर्ज थकलेल्या एस्सार स्टीलकरिता दुसऱ्यांदा बोली प्रक्रिया सोमवारी पार पडली. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर याबाबतची प्रक्रिया होत आहे.

एस्सार स्टीलकरिता लक्ष्मीनिवास मित्तल यांच्या अर्सेलरमित्तलने ४२,००० कोटी रुपयांची बोली नव्याने लावली आहे. तर न्युमेटलचा ३७,००० कोटी रुपयांचा दावा असल्याचे सांगितले जाते. स्पर्धेत अनिल अगरवाल यांची वेदांता ही तिसरी कंपनीही सहभागी आहे.

एस्सार स्टीलकरिता पात्र ठरण्यासाठी अर्सेलरमित्तलने थकित ७,००० कोटी रुपये आधी अदा करून लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन कंपनी लवादाने केले होते. त्यानंतरच अर्सेलरमित्तल एस्सारस्टीलच्या खरेदीप्रक्रियेत सहभागी झाली.

न्युमेटलमध्ये एस्सार स्टीलचे प्रवर्तक रुईया कुटुंबियांचा हिस्सा असल्याच्या आक्षेपामुळे एस्सार स्टीलच्या प्रक्रियेला विलंब लागला होता.

अर्सेलरमित्तलने उत्तम गालवा स्टील्स आणि केएसएस पेट्रॉनची थकित रक्कम देईपावेतो एस्सार स्टीलकरिता ही कंपनी पात्र ठरणार नाही, असे कंपनी लवादाने यापूर्वी स्पष्ट केले होते. यानुसार अर्सेलरमित्तलला मंगळवार, ११ सप्टेंबरपूर्वी रक्कम भरणे गरजेचे होते.

तर एस्सार स्टीलकरिता ३७,००० कोटी रुपयांची बोली लावणाऱ्या न्युमेटलने एस्सार स्टीलच्या प्रकल्पाकरिता कच्चे उत्पादन पुरविणाऱ्या ओडिशा स्लरी पाईपलाईन इन्फ्रास्ट्रक्चरला २,००० कोटी रुपये अतिरिक्त देण्याचे मान्य केले होते.

अर्सेलरमित्तलने तिची जपानी भागीदार कंपनी निप्पॉन स्टील अँड सुमिटोमो मेटल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने सोमवारी ४२,००० कोटी रुपयांची बोली लावल्याचे स्पष्ट केले. अर्सेलरमित्तलने पहिल्या प्रक्रिये दरम्यान ३१,००० कोटी रुपयांमध्ये एस्सार स्टीलकरिता रस दाखविला होता. दुसऱ्या टप्प्यात कंपनीने हा दावा अधिक रकमेद्वारे केला.