रुईयांचा पूर्ण ५४ हजार कोटींच्या परतफेडीचा प्रस्ताव डावलला

नवी दिल्ली : सुमारे ४५,००० कोटी रुपयांचे थकीत कर्ज असलेल्या एस्सार स्टीलवरील  अर्सेलरमित्तलची दावेदारी कर्जदात्या बँकांच्या समितीने मान्य केली आहे. सर्व ५४,३८९ कोटींची देणी भागवण्याची तयारी दर्शविणाऱ्या एस्सार स्टीलचे प्रवर्तक रूईया बंधू आणि भागधारकांच्या प्रस्तावाला बँकांच्या समितीने डावलल्याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लक्ष्मी मित्तल यांच्या अर्सेलरमित्तलने सर्वाधिक ४२,००० कोटी रुपयांची बोली लावली आहे.

थकीत ४५,००० कोटी रुपयांसह एकूण ५४,३८९ कोटी रुपये बँकांना देण्याची तयारी दर्शविणाऱ्या एस्सार स्टीलच्या प्रवर्तक आणि भागधारकांकडून गुरुवारी अचानक पुढे आला आणि अर्सेलरमित्तलच्या एस्सार स्टीलच्या दावेदारीबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. नादारी आणि दिवाळखोरी संहितेच्या कलम १२ ए अन्वये राष्ट्रीय कंपनी कायदे लवादापुढील प्रकरण माघारी घेतला जावा, असा भागधारकांनी बँकांच्या समितीपुढे प्रस्ताव ठेवला होता. मात्र याबाबतचा अंतिम निवाडय़ाचा अधिकार बँकांच्या समितीला असल्याने त्यांच्या अंतिम भूमिकेकडे लक्ष लागले होते.

तथापि एस्सार स्टीलला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीने गुरुवारीच अर्सेलरमित्तलची बोली मान्य केल्याचे समजते. विशेष म्हणजे याच दिवशी एस्सार स्टीलच्या प्रवर्तकांनीही संपूर्ण थकीत कर्जरक्कम फेडण्याची तयारी दर्शविली. याबाबतचा प्रस्ताव कंपनीच्या संचालक मंडळ व भागधारकांनी मंजूर केल्याचे एस्सार स्टीलने गुरुवारीच जाहीर केले.

बोली प्रक्रियेद्वारे अर्सेलरमित्तलने जपानच्या निप्पॉन स्टील अँड सुमिटोमो मेटल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने एस्सार स्टीलकरिता आपली दावेदारी सादर केली आहे. अनिल अगरवाल यांचा वेदांता समूहही एस्सार स्टीलच्या स्पर्धेत होता, तर रशियाच्या न्युमेटलने या स्पर्धेतून नंतर माघार घेतली आहे.

तांत्रिक सबब कारण बनू नये

अर्सेलरमित्तलच्या बोलीला देकार दिला गेला असला तरी आपण सर्वाधिक रकमेच्या परतफेडीची दर्शविलेली तयारी बँकांच्या समितीने लक्षात घ्यावी, असे एस्सार स्टीलच्या प्रवर्तकांनी म्हटले आहे. केवळ बोलीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला  प्रस्ताव सादर झाला या तांत्रिक खुसपटीतून तो फेटाळणे योग्य ठरणार नाही. नादारी आणि दिवाळखोरी संहितेच्या कलम १२ अ अन्वये, सुरू असलेली प्रक्रिया कर्जदात्या बँकांच्या समितीने ९० टक्के बहुमत झाल्यास माघारी घेता येऊ शकते, याकडे कंपनीच्या या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.