जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार कंपनी सौदी आरोम्को ही भारतातील बाजार भांडवलाच्या दृष्टीने सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेल व्यवसायामध्ये २० टक्के भागीदारी १५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या बदल्यात मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मार्च २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असलेली ही प्रक्रिया करोनामुळे लांबली आहे.

सौदी आरोम्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन नासेर यांनी रिलायन्सच्या तेल व रसायने (ओ २ सी) व्यवसायामधील हिस्सेदारीसंबंधी स्वारस्य स्पष्ट करताना, सध्या केवळ या अंगाने चाचपणी सुरू असल्याचे सांगितले. ही चाचपणी पूर्ण झाल्यावर आणि अन्य गुंतवणूकदारांशी मसलत करून नेमका निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमधील पारंपरिक पेट्रोलियम आणि रिफायनरी व्यवसायातील २० टक्के भागभांडवल आरोम्कोला विकण्याची योजना असल्याचे खुद्द मुकेश अंबानी यांनी जाहीर केले होते. मात्र दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आरोम्कोबरोबरचा हा व्यवहार ‘ऊर्जा बाजारपेठेतील आकस्मिक घडामोडी आणि करोना महामारीमुळे लांबणीवर पडला’ असल्याचे स्पष्टीकरण अंबानी यांनी दिले. त्या समयी त्यांनी हा व्यवहार रुळावर आहे अथवा तो पूर्ण करण्यासंबंधीचे नवीन वेळापत्रक निर्धारित करण्यात आले आहे वगैरे कोणतीही माहिती दिली नव्हती.

आरोम्कोचे मुख्याधिकारी अमिन नासेर यांनी अद्याप त्या संबंधाने प्रक्रिया सुरूच असल्याचे स्पष्ट करणारे विधान मंगळवारी केले. मात्र हा व्यवहार केव्हा पूर्ण होईल हे त्यांनीही स्पष्ट केले नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ओ २ सी व्यवसायाचे मूल्यांकन १५० अब्ज अमेरिकी डॉलर असे करण्यात आले असून, यामध्ये जामनगरमधील दोन रिफायनरी, पेट्रोकेमिकल संकुल आणि भागीदारीतील इंधन विक्री व्यवसायातील ५१ टक्के मालकी यांचा समावेश होतो.