जिग्नेश शाह यांनी प्रवर्तित केलेल्या फायनान्शियल टेक्नॉलॉजीजचे ‘मल्टिकमॉडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स)’ या वस्तू वायदा बाजारातील भागभांडवल सध्याच्या २६ टक्क्य़ांवरून २ टक्क्यांवर आणण्याचे वायदा बाजार आयोग (एफएमसी)ने दिलेल्या फर्मानापासून तात्पुरत्या संरक्षणासाठी आज मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. परंतु, भागभांडवलासंबंधी यथास्थिती कायम ठेवण्यास न्यायालयाने नकार दिला आणि या प्रकरणी तसेच जिग्नेश शाह संचालक राहिलेल्या ‘एनएसईएल’मधील घोटाळ्याबाबत गुंतवणूकदारांकडून दाखल सर्व याचिकांवर गुरुवारी एकत्रित सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
अलीकडेच वायदा बाजार आयोगाने फायनान्शियल टेक्नॉलॉजीज आणि तिचे प्रवर्तक जिग्नेश शाह हे देशात कोणताही बाजार मंच चालविण्यासाठी पात्र नाहीत, असे नमूद करीत एमसीएक्स या बाजारमंचातील त्यांचे भागभांडवल दोन टक्के मर्यादेत आणण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला आव्हान देणारा शाह यांचा अर्ज मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांच्या खंडपीठाने विचारात घेताना, स्थगन आदेशाची मागणी नाकारली आणि एकत्रित सुनावणीचा निर्णय जाहीर केला.
वायदा बाजार आयोगाचा आदेश येण्याआधीच एमसीएक्सच्या संचालक मंडळावरील फायनान्शियल टेक्नॉलॉजीज्च्या तिन्ही प्रतिनिधींनी राजीनामे दिले असून, आता या बाजारमंचावर प्रवर्तकांचे प्रतिनिधित्व नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. परिणामी फायनान्शियल टेक्नॉलॉजीजच्या २६ टक्के भागभांडवलाने एमसीएक्सच्या भागधारकांमध्ये कोणताही पूर्वग्रह निर्माण होण्याचा संभव नाही.
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल)ने गुंतवणूकदारांची देणी थकविल्याच्या प्रकरणात चौकशी व फौजदारी गुन्हे दाखल झाले असताना, वायदा बाजार आयोगाकडून असा आदेश येणे अयोग्य असल्याचेही फायनान्शियल टेक्नॉलॉजीजचा पक्ष मांडणारे वकील द्वारकादास यांनी युक्तिवाद केला. चौकशी सुरू असलेल्या संस्थांकडून दोषी ठरविले गेले नसतानाही, वायदा बाजार आयोगाकडून मात्र फायनान्शियल टेक्नॉलॉजीजला लक्ष्य केले जात असल्याचा त्यांनी दावा केला.
तथापि आपल्याच एका उपकंपनीत काय गौडबंगाल सुरू आहे, हे प्रवर्तक या नात्याने फायनान्शियल टेक्नॉलॉजीज आणि तिच्या संचालकांना कोणतीच माहिती नव्हती यावर विश्वास ठेवता येत नाही, अशी वायदा बाजार आयोगाच्या वतीने इक्बाल छागला यांनी बाजू मांडली.
जिग्नेश शाह यांनी नोव्हेंबर २००३ साली एमसीएक्स या बाजारमंचाची स्थापना केली, परंतु त्यांनी प्रवर्तित केलेला दुसरा बाजारमंच ‘एनएसईएल’मधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर, एमसीएक्सच्या उपाध्यक्षपदावरून ते ९ ऑक्टोबर २०१२ रोजी पायउतार झाले. तर फायनान्शियल टेक्नॉलॉजीज या प्रवर्तक समूहाचे प्रतिनिधित्व करणारे जोसेफ मॅसी व श्रीकांत जवळगेकर यांनी त्या आधीच आपापल्या पदांचे राजीनामा दिले होते. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास शाखेने दोनच दिवसांपूर्वी एनएसईएल घोटाळ्यांसंबंधी ९८०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असले तरी, त्यात जिग्नेश शाह, मॅसी व जवळगेकर या तिघांनाही आरोपी करण्यात आलेले नाही.