13 July 2020

News Flash

‘ईएलएसएस’मधून किती करबचत शक्य?

ईएलएसएस ही नावाप्रमाणे भांडवली बाजाराशी निगडित म्युच्युअल फंड योजना आहे.

भालचंद्र जोशी

कष्टाने कमावलेल्या पशाच्या उत्तम प्रकारे विनियोगाला प्रत्येकाचाच अग्रक्रम असतो. या विनियोगाला करकपातीने कात्री बसू नये असाही मग अनेकांचा प्रयत्न असतो. त्यासाठी आपल्यापैकी बहुतेक जण जानेवारी ते मार्च महिन्यात करपात्र मिळकतीचे नियोजन करण्यात व्यग्र असतात. कर बचत करणाऱ्या वित्तीय उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

कर बचत करणाऱ्या पर्यायांच्या तुम्ही शोधात आहात का? बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी, समभाग संलग्न बचत योजना (इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स -ईएलएसएस) हा एक पर्याय आहे. तेव्हा आज आपण ईएलएसएस म्युच्युअल फंडांची माहिती करून घेऊ या.

ईएलएसएस म्युच्युअल फंड म्हणजे काय?

ईएलएसएस ही नावाप्रमाणे भांडवली बाजाराशी निगडित म्युच्युअल फंड योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीतून आयकर कायद्याच्या ‘कलम ८० सी’अंतर्गत कर वजावटीचा लाभ मिळविला जाऊ शकतो. ईएलएसएस फंडातून समभागांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक केली जाते. इतर सर्व करबचत करणाऱ्या पर्यायांपेक्षा हा वेगळा पर्याय  आहे. कर बचतीव्यतिरिक्त संपत्ती निर्मितीची अधिक क्षमता ही ईएलएसएसचे प्रामुख्याने वेगळे वैशिष्टय़ आहे. ईएलएसएसमधील गुंतवणूक तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या आधीन असते आणि योजनेतून मिळणारे उत्पन्न म्हणजेच लाभांश आणि भांडवली नफा करमुक्त असतात.

किती करबचत करू शकतो?

काही अटींच्या आधीन राहून दर वर्षी ईएलएसएस फंडात गुंतवणूक करून जास्तीत जास्त ४६,८०० रुपयांपर्यंत करबचत करू शकतो. करपात्र मिळकत ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा व्यक्ती आणि अविभक्त िहदू कुटुंब (एचयूएफ) आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ‘कलम ८० सी’च्या तरतुदींअंतर्गत ईएलएसएस योजनांमध्ये कमाल दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. करपात्र मिळकत आणि गुंतवणूक यानुसार करबचत त्याप्रमाणात कमी होऊ  शकते.

त्याचप्रमाणे, ईएलएसएस योजनांमधील गुंतवणूक तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या आधीन असते. म्हणजे युनिट्सच्या वाटपाच्या तारखेपासून गुंतवणूक मोडल्यास करबचत लाभाला मुकावे लागेल. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी कर सल्लागाराचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.

कर नियोजन ही कठीण प्रक्रिया असली तरी म्युच्युअल फंडांनी ईएलएसएसच्या माध्यमातून करलाभ मिळविण्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत दिली आहे आणि त्याचबरोबर भांडवली बाजाराचा सर्वाधिक संभाव्य फायदा करून घेणे हा तिचा मुख्य उद्देश आहे.

भांडवल वृद्धी : गुंतवणूक करणारी व्यक्ती आपली दीर्घ मुदतीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ईएलएसएस फंडांचा उपयोग करून घेऊ शकते. वृद्धी (ग्रोथ) पर्यायाची निवड करून, आपण चक्रवाढीचा लाभ करून घेऊ  शकते आणि आवश्यक निधी जमा करू शकते.

करबचत : दीड लाखापर्यंत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्यातील ‘कलम ८० सी’ अंतर्गत करबचत करता येते. गुंतवणूक व त्या अनुषंगाने होणारी करबचत याचे उदाहरण खालील तक्यात दिले आहे.

एसआयपी पर्यायाची उपलब्धता: एकदम मोठय़ा रकमेची गुंतवणूक करू शकत नसल्यास, सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लान (एसआयपी) द्वारे मासिक पद्धतीने गुंतवणूक शक्य आहे. या पद्धतीमुळे एखाद्या महिन्यात मोठय़ा रकमेची गुंतवणूक करण्यामुळे पडणारा ताण कमी करता येतो आणि त्याचप्रमाणे त्यामुळे कालांतराने ‘रूपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’चाही लाभ मिळतो.

उच्च परताव्याची शक्यता : हा परतावा बाजारपेठेशी निगडित असतो आणि त्याची खात्री नसते. गुंतवणूकदारांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ईएलएसएसमधील गुंतवणूक प्रामुख्याने इक्विटी म्युच्युअल फंडात  असल्यामुळे लॉक इन कालावधी नंतर मोकळी होणारी रक्कम परत पुन्हा गुंतवणूक करून दर तीन वर्षांनी पुन्हा गुंतवणूक करून कर लाभ  घेता येतो.  तरीसुद्धा कमीत कमी पाच ते सात वर्षांच्या कालावधीसाठी या फंडांमध्ये गुंतवणूक करावी आणि गुंतवणुकीवर चक्रवाढ दराने उच्च परतावा मिळवावा. त्याचप्रमाणे नव्याने एसआयपी किंवा एकरकमी गुंतवणूकसुद्धा करू शकतो.

(म्युच्युअल फंडातील गुंतवणुक बाजारपेठेतील जोखमीच्या आधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.)

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा विभागाचे प्रमुख)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 2:57 am

Web Title: article about elss mutual fund zws 70
Next Stories
1 दूरसंचार कंपन्यांना दरवाढीला मुभा
2 काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगच्या  कारवाया नियमबाह्य़च – ‘सेबी’प्रमुख
3 सेन्सेक्स, निफ्टी उच्चांकी
Just Now!
X