मकरंद जोशी
टाळेबंदी लागू करण्यात आली तेव्हा भारतातील उद्योगजगत, व्यापाऱ्यांकडून आणि एकंदर मालक समाजाकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पगार/वेतन मिळत राहील, अशी अपेक्षा करण्यात आली. प्रत्यक्षात या काळात बेरोजगारीमध्ये भरमसाट वाढ होऊन तिचे प्रमाण २३-२४ टक्क्यांपर्यंत वाढले. जसजशी टाळेबंदीत शिथिलतेची प्रक्रिया सुरू झाली (म्हणजे ग्राहक वस्तू-सेवांचा लाभ घेऊ लागले) तशी बेरोजगारीची परिस्थिती आटोक्यात येऊ लागली. तेव्हा एक मूलभूत प्रश्न हाच की, कर्मचाऱ्यांना पगार कोण देतो? मालक की त्या उद्योगाचे ग्राहक? नक्कीच हा निर्णय मालक घेतात, पण वस्तूंच्या विक्रीतून मिळणारा मोबदला कमी झाल्यावर त्या पैशाच्या विनिमयातील प्राधान्यक्रमात बदल झाला आणि त्याचा परिणाम रोजगारावर झाला.
अमूल मॉडेल
सुमारे ५२,००० कोटी रुपये एवढी प्रचंड उलाढाल असणाऱ्या अमूल या सहकारी उद्योगाची व्यवसायाकडे बघण्याची दृष्टी खूप वेगळी आहे. दूध महाग विकत घेऊन ते कमीत-कमी दरांत ग्राहकांपर्यंत पोहोचवावे, अशी त्यांची भूमिका आहे. याचा अर्थ प्राधान्यक्रमात ग्राहक आणि पुरवठादार प्रथम आणि कर्मचारी, वितरक हे दुय्यम स्थानावर येतात. या भूमिकेमुळे जे शेतकरी अमूलला दूध पुरवतात त्यांना जास्त मोबदला मिळतो, असा त्यांचा दावा आहे. एका अभ्यासानुसार अमूलच्या प्रचंड उलाढालीमुळे आणि या प्राधान्यक्रमामुळे शेतकऱ्यांना १५-२० टक्के जास्त मोबदला मिळतो. अमूलच्या दुधाचे आणि इतर उत्पादनाचे दर किफायतशीर असल्यामुळे त्यांची विक्री जास्त आहे. पुरवठादारच अमूलचे मालक असल्याने त्यांना हे शक्य होतं.
चांदी विकत घेऊन सोनं विका!
साधारणपणे कमीत कमी भावात खरेदी करून जास्तीत जास्त भावाला विक्री करणे हा उद्योजकाचा उद्देश असतो. या उद्देशामागे मूलभूत प्रेरणा नफा ही असते. माझ्या एका ग्राहकाने मला हे खूप छान शब्दांत सांगितलं होतं. तो म्हणाला- I buy silver, make it gold and sell it.. म्हणजे मी माझ्या उद्योगात/उत्पादनात निपुण असल्याने मी कमी भावात माल घेऊन त्याला उच्च भावात विकू शकतो. चांदीपासून सोनं बनवण्याची त्याची उपमा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावून देते.
तुमचा प्राधान्यक्रम काय? या प्रश्नच उत्तर जितकं स्पष्ट तितकी त्या उद्योगाची दिशा अचूक ठरते. पुरवठादार, कर्मचारी, मालक, बँक या चौघांमध्ये पैशाचं वितरण करताना या उद्योगाची वैचारिक बैठक महत्त्वाची ठरते.
माझा सर्व नफा बँक नेते का?
गेल्या काही काळापासून अनेक उद्योगसमूह कर्जाच्या बोजावरून चर्चेत होते आणि त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी शेवटी त्यांना आपले उद्योग विकावे लागले आणि जे उद्योग योग्य वेळी विकले जाऊ शकले नाहीत ते दिवाळखोर घोषित झाले. याच काळात रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ ही कंपनी उभारून तिच्या जोरावर कर्जमुक्ती मिळवली.
वेळ/ नफा/ भांडवल कुठे गुंतवता?
जे उद्योजक आपला वेळ आणि ज्या कंपन्या आपला नफा/भांडवल अत्यंत प्रभावशाली उत्पादन निर्मितीत किंवा अत्यंत प्रभावशाली सेवा देण्यामध्ये गुंतवतात त्यांना आपल्या ग्राहकांना, पुरवठादारांना, कर्मचाऱ्यांना खूश ठेवणे शक्य होते. या सर्व हितसंबंधांमधील प्राधान्यक्रम, उद्योजकीय वेळेचा व साधनांचा योग्य वापर या गोष्टींचं महत्त्व मागील घडामोडींतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 1, 2020 12:12 am