* सुधीर जोशी

सरकारी आर्थिक उपाययोजनांवर नाराजी व्यक्त करून या आठवडय़ाची सुरुवात बाजाराने साडेतीन टक्क्यांच्या घसरणीने केली. पुढील तीन दिवसांत बाजार थोडासा सावरला. पण शेवटच्या दिवशी रिझव्‍‌र्ह बँके ने जाहीर केलेल्या रेपो दरातील कपातीने व कर्जे फेडण्यास दिलेल्या मुदतवाढीने बाजाराचे समाधान झाले नाही व वित्तीय क्षेत्राच्या समभागात घसरण झाली. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये ४२५ अंकाची तर निफ्टीत ९७ अंकांची घसरण झाली.

रिलायन्सच्या हक्क भाग विक्रीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या आठवडय़ात सुरू झाली. अर्जासोबत फक्त २५ टक्केच रक्कम भरायची असून उर्वरित रक्कम दोन हप्त्यात पुढील वर्षी भरायची आहे. त्यामुळे भारतातील सर्वात मोठय़ा कंपनीच्या उदयोन्मुख व्यवसायात सुलभ  हफ्त्यांवर गुंतवणूक करणे शक्य आहे. गुंतवणूकदार हक्कभाग बाजारातून विकतही घेऊ शकतात. अनेकांच्या मनात सध्याचा भाव पुढे टिकेल का नाही अशी शंका येणे रास्त आहे. बाजाराचा कल हमखास सांगणे कठीण असल्यामुळे आपल्या जवळचे काही समभाग सध्याच्या किमतीला विकून नवीन हक्कभाग घेताना थोडी जास्त मागणी नोंदवण्याचे धोरण ठेवून जोखीम कमी करता येईल.

बजाज ऑटोच्या विक्रीमध्ये घट झाली असली तरी खर्चावरील नियंत्रण, परकीय चलनाचे अनुकूल दर, दुचाकींच्या निर्यातीमधील वाढ अशा कारणांमुळे वर्षअखेर कंपनी नफ्याची पातळी कायम ठेवू शकली. पहिल्या तीन महिन्यांत कोविड संकटाचा कंपनीच्या कारभारावर परिणाम होईल.

पण टाळेबंदी नंतर सार्वजनिक वाहनापेक्षा स्वत:च्या वाहनाचा पर्याय लोक स्वीकारतील व शेती उत्पन्नाच्या अनुकूलतेमुळे ग्रामीण भागातून दुचाकी वाहनांना मागणी वाढेल. कंपनीच्या समभागावर लक्ष ठेवायला हवे.

डॉ. रेड्डीज् लॅबच्या मागे गेली दोन वर्षे लागलेला एफडीएचा ससेमिरा संपल्याची चिन्हे दिसत आहेत. कंपनीने मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांत उत्पन्नामध्ये १३ टक्के तर नफ्यात ११ टक्के वाढ जाहीर  केली आहे. भारतातील पहिल्या पाच औषध कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या कंपनीच्या समभागात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास हरकत नाही.

कोविड संकटाला स्वीकारून पुढे जाण्याचे प्रयत्न अनेक देशांनी सुरू केले आहेत. आपल्या देशातही अनेक उद्योगांनी तशी तयारी सुरू केली आहे. पुढील आठवडय़ात मर्यादित प्रमाणात नागरी विमान वाहतूक सुरू होत आहे. उद्योग पुन्हा सुरू करणे तसे सोपे नाही. आंशिक टाळेबंदी व मजुरांच्या स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा लहान उद्योगांना सर्वात जास्त फटका बसतो आहे.

बुडीत कर्जाचा धोका बँकांना नजीकच्या काळात भेडसावत राहणार आहे. भारतातील करोना संसर्गाचे वाढते आकडे व राष्ट्रीय उत्पन्नाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजाने बाजारात निराशमय वातावरण आहे.

सरकार व रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणाबाबतची उत्सुकता संपल्यामुळे व बाजाराचे लक्ष आता टाळेबंदी संपण्याकडे व परदेशी बाजारांवर आहे. अमेरिका – चीनमधील संघर्ष व करोनाचा फैलाव तर कधी त्यावर इलाज सापडण्याच्या बातम्या बाजाराला अस्थिर ठेवतील.

sudhirjoshi23@gmail.com