वर्षांसन (अ‍ॅन्युइटी) हे एकमेव असे वित्तीय साधन आहे, जे तहहयात, निश्चित उत्पन्नाची हमी देते..

भारतीय हे ‘जात्याच बचतकर्ते’ म्हणून ओळखले जातात. मात्र आपल्यासाठी आयुष्यभर पुरेल इतकी पुंजी निर्माण करण्यासाठी नियमित किती रकमेची बचत करायला हवी, अशा अंकगणिताची मांडणी सर्वसामान्यांना जमतेच असे नाही. जरी ते जमले तरी वैद्यकीय आणि आरोग्यनिगेच्या सुविधांमध्ये होत असलेला सुधार पाहता, वयोमान वाढत जाणे आणि कष्टाने कमावलेल्या पैसाही वाढलेल्या आयुर्मानाला पुरा पडणार नाही, ही जोखीम आहेच. त्यामुळे कामकरी वयातच सेवानिवृत्तीसंबंधी पक्के नियोजन हे प्रत्येकासाठी अत्यावश्यक बनले आहे.

भारतात संघटित क्षेत्रातील पगारदारांसाठी निवृत्ती नियोजन हे वर्षांसन योजनेनुसार (अ‍ॅन्युइटी प्रॉडक्ट्स) सक्तीनेच केले जात आहे. अशा पगारदारांच्या सेवानिवृत्तीच्या रकमेचा हिस्सा हा त्याच्या/तिच्या निवडीच्या वर्षांसन पर्यायांमध्ये गुंतविला जाऊन, त्यायोगे हयातभर नियमित उत्पन्नाची खातरजमा केली जाते. तथापि आपल्या कामकरी वर्गातील मोठा हिस्सा हा खासगी आणि असंघटित क्षेत्रातील असून, तेथे सामाजिक सुरक्षेच्या उपायांचा संपूर्ण अभाव असल्याने या मंडळींना आपणहून निवत्ती नियोजन करणे नितांत आवश्यक बनले आहे. निवृत्तीनंतर आपण जरी बरेच वर्ष जगू शकलो नाही, तरी आपल्यापश्चत आपल्या वैवाहिक जोडीदाराला मोठे आयुष्य जगायचे आहे, या गोष्टीचाही विचार करावा लागेल. त्या स्थितीत आपल्यावर अवलंबून असलेल्या जोडीदारासाठी आर्थिक आधाराची तजवीज करण्याची जबाबदारी आपल्याला झटकता येणार नाही.

सध्या, विविध गुंतवणूक साधने उपलब्ध आहेत जे एका व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर एकरकमी मोठा लाभ मिळवून देतात. आक्रमक बाजार-संलग्न योजनांपासून ते काहीशा सनातनी, पारंपारिक पद्धतींपर्यंत विविध प्रकारच्या साधनांची निवड आपण करू शकतो. बँका, म्युचुअल फंड कंपन्या आणि जीवन विमा कंपन्यांनी या योजना देऊ केल्या आहेत. तथापि, या योजनांची उणीव हीच की, प्रचलित व्याजदरानुसार आजीवन निश्चित उत्पन्नाची हमी आणि खात्री त्या देत नाहीत.

वर्षांसन (अ‍ॅन्युइटी) हे एकमेव असे वित्तीय साधन आहे, जे दीर्घ मुदतीसाठी आणि तहहयात, निष्टिद्धr(१५५)त स्वरूपाच्या उत्पन्नाची हमी देते. हे वर्षांसन उत्पन्न जीवनभरासाठी मिळण्याची हमी असते, मग २००८ सालासारखे जागतिक पत-अरिष्ट निर्माण होवो अथवा सध्यासारखी व्याजदरात (नव्वदीतील ११ ते १३ टक्कय़ांवरून २०१८ सालात ७ टक्के) लक्षणीय घसरण झालेली असो.

वर्षांसनाचे काही अंगभूत फायदे आहेत जे नियमित उत्पन्न स्रोताव्यतिरिक्त बरेच काही प्रदान करतात. वर्षांसन उत्पादनांचे मुख्य फायदे हे की, मेहनतीने कमावलेला पैसा संपूर्ण आयुष्यभरासाठी कायम सोबत करेल आणि ते तुमच्यापश्चात तुमच्या पती / पत्नीला सातत्याने आर्थिक मदत पुरवत राहील. ही योजना निश्चित भविष्यकालीन उत्पन्नाची हमी देते आणि ही हमी आजपासून सुरू होऊन, उर्वरित आयुष्यासाठी चालू राहते. भविष्यातील व्याजदरातील किंवा बाजारांतील चढउतार किंवा आर्थिक वातावरणातील बदल या सारख्या कोणत्याही बा’ कारणांचा वर्षांसनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होत नाही. सेवानिवृत्तीनंतर निश्चित उत्पन्नस्रोत सुरू राहणे या ज्येष्ठांसाठी एका महत्त्वाच्या घटकाचे निवारण हे अशा तऱ््हेने होते.

आयुर्विमा कंपन्यांकडून वर्षांसन योजना उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत आणि त्यापैकी काही लोकप्रिय योजनांची साधारण रचना अशी आहे –

आजीवन वर्षांसन – सध्या असलेल्या व्याजदरानुरूप आयुष्यभरासाठी नियमित उत्पन्न.

खरेदी किंमतीच्या परतफेडीसह आजीवन वर्षांसन – ज्याच्या नावे वर्षांसन केले गेले (अ‍ॅन्युइटंट) तो हयात असेपर्यंत नियमित उत्पन्न आणि त्याच्या मृत्यूपश्चात गुंतविलेले भांडवल हे नामनिर्देशित व्यक्तीला (नॉमिनी) प्रदान केले जाते.

संयुक्त जीवन वर्षांसन – दाम्पत्याला निश्चित वर्षांसन लाभाची हमी दिली जाते आणि दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा हयात असेपर्यंत ती सुरू राहते. दोघांच्याही मृत्यूपश्चात गुंतविलेले भांडवल हे नामनिर्देशित व्यक्तीला (नॉमिनी) प्रदान करण्याच्या पर्यायाचीही या योजनेला जोड देता येऊ शकेल.

  • त्वरित (इमिडिएट) आणि विलंबित (डिफर्ड) असे वर्षांसन उत्पादनांचे दोन प्रकार आहेत. यापैकी कशाची निवड करावी हे वयानुसार ठरवता येईल. त्वरित वर्षांसन योजनेत, खरेदीनंतर ताबडतोब पुढील महिन्यापासून लाभ सुरू होतात. त्यामुळे सेवानिवृत्ती समीप असलेल्या व्यक्तींसाठी त्वरित वर्षांसन योग्य ठरते. तर भविष्यात निर्धारीत केलेल्या तारखेपासून निश्चित लाभ हे विलंबित वर्षांसनातून मिळविता येतात.
  • त्वरित वर्षांसनाचे दर हे आधीच उपलब्ध करून दिले जातात, ज्यामुळे एखाद्याला त्याच्या नजीकच्या भविष्यातील उत्पन्न नेमके किती असेल हे त्याचवेळी कळू शकते.
  • विलंबित वर्षांसनाचे आणखी दोन उपप्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे ठरावीक काळासाठी रक्कम जमा करीत जावे आणि भविष्यातील निर्धारित तारखेस तुम्हाला नियमित लाभ सुरू केले जातील. अशा स्थितीत लाभ दर तत्कालीन वर्षांसन दरावर आधारलेले असल्याने भविष्यात उत्पन्न नेमके किती हे अंदाजणे अवघड असते. दुसऱ्या प्रकारात मात्र जरी वर्षांसन लाभ भविष्यातील निर्धारीत तारखेपासून सुरू होणार असले तरी लाभाचा दर काय असावा हे खरेदीसमयीच निश्चित करण्याची मुभा असते.

(लेखक एचडीएफसी लाइफच्या उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष आहेत)