मकरंद जोशी

सुझुकी समूह स्थापनेचे १०० वे वर्ष २०२० सालात साजरे करत आहे. गमतीचा भाग म्हणजे जपानमध्ये सन ५७८ मध्ये ‘काँगो गुमी’ या बांधकाम व्यवसायातील कंपनीची स्थापना झाली आणि या कंपनीचा आजही व्यवसाय सुरू आहे. म्हणजे १४४२ वर्ष ही कंपनी अव्याहतपणे व्यवसाय करत आहे! युरोपमध्ये ३०० ते १००० वर्ष अव्याहतपणे चालू असणारे अनेक उद्योग आहेत. त्यातील अनेक कंपन्यांची मालकी/प्रवर्तक एकाच कुटुंबातील आहेत तेसुद्धा इतकी वर्ष, आहे ना कौतुकास्पद! भारताचा विचार करता वाडिया हा उद्योग समूह साधारण २८० वर्ष आपला वारसा चालवत आहे. या समूहामधील बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन ही कंपनी गेली १५७ वर्ष कार्यरत आहे. भारतात टाटा समूहही गेली १५७ वर्ष विविध उद्योगांद्वारे भारतीयांची सेवा तसेच संपत्ती निर्माण करत आहेत. मानवी आयुष्याला मर्यादा असली तरी त्याने चालू केलेला उद्योग शेकडो-हजारो वर्ष चालू शकतो! आणि रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे’ या उक्तीला धरून हे कार्य होऊ शकते हे निश्चित!

आपण जर टाटा समूहाकडे पाहिलं तर दिसते की, सचोटी, कर्तव्य तत्परता, उत्कृष्ट दर्जा, ऐक्य, नावीन्य अशा मूल्यांच्या बाबतीत अधिकाधिक प्रामाणिक प्रयत्न करत या समूहाने आपले उद्योग सातत्याने वाढवले आणि टिकवले आहेत. या समूहाची मालकी मुलांच्या नावाने न करता ही मालकी ट्रस्ट स्वरूपात ठेवून अत्यंत उच्च दर्जाच्या मूल्यांच्या जोरावरच, जमशेदजी टाटांनी रुजवलेल्या बीजाचे आज प्रचंड वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

चिरंजीवित्व :

भारतीय पुराणानुसार माणूस जरी मर्त्य असला तरीही हनुमान, बिभीषण इत्यादी सात जण चिरंजीव आहेत असा आपला सर्वसाधारण समज आहे. त्याच धर्तीवर जरी सर्वसाधारणपणे अनेक उद्योग नादारी कायद्याअंतर्गत किंवा करोना संकटामुळे अस्तित्व गमावत असूनदेखील काही उद्योग मात्र आपले चिरंजीवित्व शाबूत ठेवण्यात किंबहुना आपल्या अस्तित्वाद्वारे सातत्याने समाजोपयोगी वस्तू/ सेवा पुरवत आपल्या भागधारक, पुरवठादार, प्रवर्तक इत्यादींच्या संपत्तीत सतत वृद्धी करत आहेत.

चिरंजीवित्व साधण्यासाठी उपयुक्त धोरणे :

१. दीर्घ आणि लघु मुदतीच्या उद्दिष्टांची स्पष्टता – उद्योजकाला आणि उद्योगाला त्याच्या दीर्घ मुदतीच्या आणि लघु मुदतीच्या उद्दिष्टांची स्पष्टता जितकी अधिक आणि ही उद्दिष्टे जितकी सर्वसमावेशक तितकी उद्योग दीर्घ मुदतीत चालण्याची शक्यता अधिक तसेच उत्तम मूल्याधारित वर्तन उद्योगाबद्दल समाजामध्ये आस्था निर्माण करते.

टाटा समूहाच्या बाबतीत अशा अनेक कथा आपण जाणून आहोत की, या उद्योगाला संकटकाळात त्याच्या भागधारकांनी, कर्मचाऱ्यांनी कशी मदत केली आणि संकटांवर मात करणे शक्य झाले. सर्वसमावेशक दीर्घ मुदतीची उद्दिष्टे हे याचं मुख्य कारण.

२. अत्युच्य/दर्जेदार सेवा/वस्तू – दर्जेदार सेवा/वस्तू आणि त्याच्यात सातत्य हे कुठल्याही उद्योगासाठी आवश्यक आहे. आजपासून १०-२० वर्षांनीही आपण पुरवत असलेल्या सेवा/वस्तू परिणामकारक कशा राहतील त्याचा विचार अशा उद्योगांनी सातत्यपूर्वक केलेला दिसतो.

३. उत्तम संचालक मंडळ – कुठल्याही कंपनीचे संचालक मंडळ किती सर्वागीण विचार करून तडफेने कार्यवाही करू शकेल हे त्या उद्योगासाठी अत्यावश्यकच ठरते. यासाठी सर्वसमावेशक संचालक मंडळाची निवड आणि त्यांना एकत्र बांधून कंपनीच्या भल्यासाठी काम करून घेऊ शकेल असा अध्यक्ष आवश्यक आहे. विश्वस्त भावनेने काम करणारे संचालक मिळवणे आणि टिकवणे ही एक उपयुक्त प्रक्रिया आहे.

४. मालकी हक्क – आपला उद्योग कंपनीच्या स्वरूपात करणे हे दीर्घमुदतीत हितकारक ठरते. तसेच कंपनीच्या भागभांडवलाची मालकी जर जास्त हितचिंतकांकडे असेल तर कंपनीच्या दीर्घकालीन टिकण्याला हातभार लागतो. प्रवर्तकांचे भांडवल हे प्रायव्हेट ट्रस्टच्या नावावर असेल तर कौटुंबिक कलहाचा कंपनीच्या दीर्घकालीन अस्तित्वावर परिणाम कमी होतो आणि कंपनीला टिकण्या-वाढण्यासाठी हातभार लागतो. मालकांनी जास्तीतजास्त पुंजी कंपनीत ठेवून त्याचा योग्य विनियोग केला, कंपनीतून पैसे काढून वैयक्तिक मालमत्ता करण्याच्या इच्छेला आवर घातला तर कंपनी करोनासारख्या संकटाचा सहज सामना करू शकते

५. श्रद्धा आणि सबुरी – मूल्यांवर श्रद्धा ठेवून उत्तमतेची कास धरून काम करण्याचे संस्कार पहिल्या पिढीला रुजवावे लागतात तरच पुढली पिढी तो वारसा अधिक जोमाने पुढे नेऊ शकते. संकटाच्या काळात, चलाखी करण्याच्या प्रलोभनांच्या क्षणी सबुरी आणि श्रद्धा या दोन मूल्यांमुळे प्रलोभनांपासून दूर राहावयास मदत होते.