अर्थगतीला पूरक गुंतवणूक वाढविण्याबाबत सरकारचा अग्रक्रम कायम राहील; एवढेच नव्हे तर जागतिक मंदीच्या विपरीत परिणामांची तीव्रता याच सुधारणापथामुळे कमी होईल, असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उघडलेल्या भांडवली बाजारात निर्देशांकांच्या पडझडीच्या पाश्र्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘ब्रिक्स’ गुंतवणूक परिसंवादाला संबोधित करताना ते बोलत होते. व्यासपीठावर सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आदी उपस्थित होते. भारतासह पाच देशांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रांची दोन दिवसीय परिषद शनिवारपासून गोव्यात सुरू होत आहे. या पाश्र्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँक व सेबी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मुंबईत गुंतवणूक परिसंवाद आयोजित करण्यात आली होती.

आर्थिक सुधारणा, धंदा-व्यवसाय करण्यात सुलभता, वाढलेली थेट विदेशी गुंतवणूक याबाबत जेटली यांनी सरकारच्या कामगिरीचा पाढा या वेळी वाचला. ते म्हणाले की, थेट विदेशी गुंतवणुकीसाठी सरकारने स्वयंचलित मार्ग उपलब्ध करून दिला असून यामुळे अनेक क्षेत्रात  ९० टक्क्यांपर्यंतच्या थेट विदेशी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग खुला झाला आहे. सरकारने गेल्या अडीच वर्षांत घेतलेल्या आढाव्यानुसार अनेक क्षेत्रांमध्ये अधिकाधिक विदेशी ओघ येण्यास सुरुवात झाली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर व्यवसायानुकूल वातारणात पूर्वीपेक्षा खूपच अधिक सुधारणा झाली असून आता कंपन्यांना विदेशी गुंतवणुकीसाठी विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळापुढे परवानगीसाठी अर्ज व प्रतीक्षा करावी  लागत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

जागतिक स्तरावरील आर्थिक वृद्धीबाबत सध्या चिंताजनक स्थिती असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मात्र भारतात राबविल्या जात असलेल्या आर्थिक सुधारणांमुळे अशा घटनांचे धक्के येथील अर्थव्यवस्थकडून सहज पचविले जातील, असे ते म्हणाले. जागतिक स्पर्धात्मकतेबाबत भारताचे स्थान उंचावत ३९ व्या स्थानावर गेले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. देशातील सुलभ व्यवसाय वातावरणामुळेच हे शक्य झाले, असेही ते म्हणाले.

अमेरिकी निवडणुका संपताच अर्थस्थिती पूर्वपदावर : जेटली

पाश्चिमात्य अर्थव्यवस्थेतील व्यापार संरक्षण प्रवृत्तीबाबतची चिंता निवडणुका होताच संपुष्टात येईल, असा विश्वास अर्थमंत्री जेटली यांनी व्यक्त केला. अर्थमंत्र्यांचा रोख याबाबत अमेरिकेतील निवडणुकीचे पारडे कोणाच्या बाजूने झुकते यावर होता. अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यानच्या वक्तव्यांवर अर्थमंत्र्यांची ही प्रतिक्रिया होती. सध्याच्या अमेरिकी सरकारच्या व्यापार संरक्षण उपाययोजना या प्रचाराच्या निमित्ताने विरोधकांच्या लक्ष्य ठरत आहेत; मात्र एकदा का निवडणुका झाल्या की अर्थव्यवस्थेसह सारे काही रुळावर येईल, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला.