जेटली यांचे ऑस्ट्रेलियात ‘मेक इन इंडिया’ परिषदेत आवाहन
ऑस्ट्रेलियाच्या उद्योगांनी मेक इन इंडियात सहभागी होऊन गुंतवणूक करावी, असे आवाहन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे मेक इन इंडिया परिषदेत केले. रेल्वे, संरक्षण, उत्पादन या क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीस वाव आहे या संधीचा परदेशी उद्योजकांनी लाभ घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताने कमी खर्चात सेवा पुरवठादार म्हणून नावलौकिक मिळवला आहे, पण कमी खर्चात उत्पादन करण्यात यश मिळालेले नाही अशी कबुली देऊन ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियाच्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी.
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री ज्युली बिशप यांच्याशी त्यांनी चर्चा केली. भारताने रेल्वे, संरक्षण व उत्पादन ही क्षेत्रे परदेशी गुंतवणुकीला खुली केली आहेत. असे सांगतानाच त्यांनी मोदी सरकारने गेल्या बावीस महिन्यात केलेल्या सुधारणांचा आढावा घेतला. आक्रसत चाललेल्या जागतिक व्यापारात निर्यात वाढ करणे, खासगी गुंतवणूक वाढवणे, लागोपाठ दोन वर्षांच्या दुष्काळाचा सामना करताना शेती क्षेत्राला वाचवणे ही आव्हाने भारतापुढे आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक पातळीवर मंदीसदृश स्थिती असताना भारताने बऱ्यापैकी उभारी धरली आहे, आम्ही आमच्या मानकानुसार आर्थिक ताकदीचा अदमास घेतो तेव्हा ७.५ टक्के या आर्थिक वाढीच्या दरापेक्षा आमची क्षमता जास्त आहे असे वाटते पण ती अजून प्रतिबिंबित झालेली नाही. आम्हाला उत्पादन क्षेत्राची काळजी आहे, सेवा क्षेत्राची वाढ जास्त झाली असली तरी उत्पादन क्षेत्रात प्रगतीसाठी परकीय गुंतवणुकीची गरज आहे असे ते म्हणाले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम बुल यांची ते उद्या भेट घेणार आहेत.