आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतिक बँकेसारख्या प्रतिष्ठित जागतिक संस्थांनी वर्तविलेल्या भाकितांशी फारकत घेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निश्चलनीकरण आणि जीएसटी या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक महत्त्वाच्या सुधारणा असल्याचे सांगत त्यांचे समर्थन करणारे प्रतिपादन केले. जेटली सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, ते जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या नियोजित वार्षिक बैठकांनाही हजेरी लावणार आहेत.

भारताच्या अर्थव्यवस्थेला मंदीने घेरले असल्याची भावना जागतिक स्तरावर अस्तित्वात नसल्याचेही जेटली यांनी प्रतिपादन केले. भारतातच अर्थव्यवस्थेसंबंधी सुयोग्य जाण नसलेल्या मंडळींकडून मंदीची ओरड सुरू असल्याचा त्यांनी टोला लगावला. न्यूयॉर्कमध्ये कोलम्बिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपुढे बोलताना, केंद्र सरकारने हाती घेतलेल्या जीएसटीसारख्या आर्थिक सुधारणा या महत्त्वपूर्ण संस्थात्मक आणि रचनात्मक सुधारणा असून, दीर्घावधीत त्यांची गोड फळे चाखता येतील, असे जेटली म्हणाले. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अधिक मजबुतीने वाट खुली करणाऱ्या या उपाययोजनांची आवश्यकताच होती, असे ते म्हणाले.

अर्थव्यवस्थेला औपचारिक स्वरूप प्रदान करण्यासाठी आणि समांतर अर्थव्यवस्थेला पायबंदासाठी टाकल्या गेलेल्या सरकारच्या पावलांचे जेटली यांनी जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, ‘अर्थव्यवस्थेला संघटित, औपचारिक रूप प्रदान करण्यासाठी एका मागोमाग एक पावले टाकली गेली. यातील काही पावले निश्चलनीकरण आणि जीएसटीची अंमलबजावणी अशी आहेत. त्यातून विक्रेते, व्यापाऱ्यांनी जुना उत्पादन साठा संपेपर्यंत नवीन मागणी तात्पुरती थांबविली. परिणामी, तिमाहीपुरता निर्मिती उद्योगावर विपरित परिणाम दिसून आला. तथापि, दीर्घ मुदतीत या संस्थात्मक व रचनात्मक सुधारणांचे खूपच चांगले परिणाम दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.