‘यूपीए’ राजवटीतील अर्थवृद्धी दराला कात्रीने वादंग

आधीच्या म्हणजे काँग्रेसप्रणीत यूपीए राजवटीत आर्थिक विकास दराच्या आकडेवारीत सुधारणा करून त्याला कात्री लावणाऱ्या पुढे आणल्या गेलेल्या तपशिलाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार समर्थन केले.

दहा वर्षांच्या काँग्रेस राजवटीत विकास दराने ६.७ टक्क्यांपुढे मजल मारता आली नाही, अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी संघटनेने बुधवारी प्रसृत करून वादंगाला तोंड फोडले. तथापि, अर्थमंत्रालयाच्या हस्तक्षेपापासून दूर असलेली ही एक उच्च प्रतिष्ठा असलेली विश्वासार्ह संस्था असल्याचे नमूद करीत अर्थमंत्र्यांनी तिची पाठराखण केली.

निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी मुख्य सांख्यिकी प्रवीण श्रीवास्तव यांच्या बरोबरीने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचा कथित पुनर्वेध घेणारी आकडेवारी घोषित केली. आधीच्या काँग्रेस राजवटीतील १० वर्षांत सरासरी जीडीपी वाढ ही त्यावेळी सांगितल्या गेलेल्या ७.७५ टक्क्यांऐवजी, बुधवारी सादर केल्या गेलेल्या सुधारित आकडेवारीनुसार ६.७ टक्के इतकीच होती. त्या तुलनेत विद्यमान सरकारच्या कार्यकाळात जीडीपी वाढीचा सरासरी वेग हा ७.३ टक्के असा सरस असल्याचे या आकडेवारीतून सूचित केले गेले.

निती आयोगाच्या बरोबरीने स्वायत्त समजल्या जाणाऱ्या केंद्रीय सांख्यिकी संघटनेने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन वादंग निर्माण करणारी माहिती जाहीर करणे, गैर आणि अनाठायी असल्याची राजकीय वर्तुळातून टीका झाली. यामागे ‘बोलविता धनी’ कोण हे उघड असल्याची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली, तर माजी मुख्य सांख्यिकी प्रणब सेन यांनी निती आयोगाच्या यातील सहभागावर प्रश्न उपस्थित केला आणि अशा निष्काम वादंगापासून सरकारने दूर राहणेच हितावह असा सल्ला दिला.

काँग्रेस राजवटीतील अंतिम दोन वर्षांतील विकासदरात वाढसूचक सुधारणा करणाऱ्या याच सांख्यिकी संघटनेच्या कृत्याचे स्वागत करणारे काँग्रेस नेते, ताज्या पुनर्वेध घेणाऱ्या आकडेवारी मग टीका कशी करू शकतात, असा प्रतिसवाल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या फेसबुकवरील लेखाद्वारे विचारला आहे. २०१५ मध्ये जे स्वागतार्ह ठरले, तेच आता विकासदर घटल्याचे दिसल्यावर झोंबल्याने टीकेचे कारण बनले आहे, असा त्यांनी पलटवार केला.

सुधारित आकडेवारी ही २०११-१२ हे आधार वर्ष मानून नव्या सिद्धांतानुसार आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या अधिक वास्तविक व व्यापक रूपाला प्रतिबिंबित करणारी आहे, असे जेटली म्हणाले.