भांडवली बाजारातील गुरुवापर्यंतची निर्देशांक आपटी ही अर्थसंकल्पातील प्रस्तावित लाभ करामुळे नव्हती, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी दिले.

२०१८-१९चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी समभागामार्फत होणाऱ्या दीर्घकालीन लाभावर १० टक्के तसेच समभागसंलग्न म्युच्युअल फंडांद्वारे वितरित होणाऱ्या लाभांशावरदेखील १० टक्के कर प्रस्तावित केला. यानंतर मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारातील घसरण विस्तार गेली. ती गुरुवापर्यंत कायम होती. जागतिक स्तरावर अनेक प्रमुख भांडवली बाजारांचे निर्देशांक गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात घसरत आहेत; त्याचे सावट येथील भांडवली बाजारावर पडले, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. सरकारच्या आर्थिक तरतुदीचे भांडवली बाजारात पडसाद उमटत नसल्याचा दावा यापूर्वी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अधिया यांनीही केला होता.