केंद्र सरकारचे एक फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणारे बजेट सज्ज झाले असून अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पारपंरिक रिवाजाचे पालन करत शनिवारी हलवा समारंभात सहभाग घेतला. नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये बजेटच्या प्रती छापण्याच्या आधी हा समारंभ करण्यात येतो. 2018 – 19 या आर्थिक वर्षाचं केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सज्ज झाला असून तो छपाईसाठी रवाना झाला आहे. त्या छपाईच औपचारीक उद्घाटन अर्थमंत्र्यांनी करण्याची प्रथा आहे.

संपूर्ण बजेट बनवण्याचं काम सुरू असताना गुप्तता पाळण्यात यावी या प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग म्हणजे हलवा समारंभ असतो. या समारंभाचा एक भाग म्हणून मोठ्या कढईमध्ये हलवा बनवण्यात येतो आणि अर्थखात्याच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप करण्यात येते.
या समारंभाची सांगड बजेटच्या कागदपत्रांच्या छपाईशी घालण्यात येते. त्याचं कारण असं आहे की, बजेटची गोपनीयता रहावी, त्यामध्ये काय आहे ते बाहेर समजू नये आणि सट्टेबाजांना वाव मिळू नये म्हणून बजेटची छपाई सुरू झाली की बजेट संसदेत सादर होईपर्यंत या खात्यातील कर्मचाऱ्यांचा जगाशी संपर्क नसतो, ते त्या एकाच इमारतीत काही दिवस राहतात.

हलवा समारंभ सुरू झाला की त्यांचा हा एकांतवास सुरू होतो आणि बजेट सादर होईपर्यंत त्यांचा जगाशी संपर्क संपतो. केवळ निवडक वरीष्ठ अधिकारीच या कालावधीत बाहेर येऊ शकतात. या गोपनीयतेचा संबंध हलवा समारंभाशी जोडला गेल्यामुळे त्याला वेगळंच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच हलवा समारंभामध्ये खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सहभागी होण्याची आणि अर्थखात्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची प्रथा पडली आहे. अरूण जेटली यांनीही या प्रथेचा मान राखत कढईमध्ये हलवा बनवण्यात सहभाग घेतला आणि नंतर त्याचा आस्वादही घेतला.

शनिवारी सुरू झालेले बजेटच्या छपाईचे काम या महिना अखेरपर्यंत सुरू राहील. बजेटचे संसदेचे अधिवेशन 29 जानेवारी रोजी सुरू होत आहे, तर अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होईल, तो सादर झाल्यानंतरच अर्थखात्याचे कर्मचारी बाहेर येऊन मोकळा श्वास घेतील.