शेतीतून उत्पन्नवाढ साधून कृषी क्षेत्राच्या दुर्दशेवर उपाययोजना या विषयावर ‘नाबार्ड’द्वारे मुंबईतील त्यांच्या मुख्यालयात आयोजित राष्ट्रीय परिसंवादाचे रविवारी (१२ जुलै) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. देशाच्या कृषीक्षेत्रापुढील आव्हानांचा ऊहापोह या निमित्ताने विविध विचारवंत आणि धोरणकर्त्यांकडून होणार आहे.

या परिसंवादाच्या निमित्ताने अर्थमंत्र्यांच्या हस्ते नाबार्डच्या ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेचा शोधक’ या ग्रामीण अर्थकारणाचा मागोवा घेणाऱ्या महत्त्वाच्या संकलनाचे अनावरण केले जाईल. तसेच १९९५ सालापासून ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (आरआयडीएफ) मार्फत राबविलेल्या विविध प्रकल्पांच्या यशस्वितेचा वेध घेणाऱ्या पुस्तकाचे जेटली यांच्या हस्ते प्रकाशन केले जाईल. केंद्राच्या वित्तीय सेवा विभागाच्या अतिरिक्त सचिव स्नेहलता श्रीवास्तव, रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार भानवाला यांचीही उद्घाटनाच्या सत्रात भाषणे होतील. तसेच दिवसभर चालणाऱ्या परिसंवादाच्या विविध सत्रांमध्ये शेतकरी समुदायातील तज्ज्ञ, सरकार, बँकांच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल.