12 December 2017

News Flash

बँकिंग क्षेत्रात कार्य करणार नाही!

गेल्या चार वर्षांपासून स्टेट बँकेत अध्यक्षा असलेल्या अरुंधती भट्टाचार्य या शुक्रवारी निवृत्त झाल्या.

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: October 7, 2017 5:33 AM

गेल्या चार वर्षांपासून स्टेट बँकेत अध्यक्षा असलेल्या अरुंधती भट्टाचार्य या शुक्रवारी निवृत्त झाल्या.

स्टेट बँकेच्या अध्यक्षपदावरून अरुंधती भट्टाचार्य निवृत्त; मुंबईतील मुख्यालयात निरोप

देशातील सर्वात मोठय़ा बँकेतून निवृत्त झाल्यानंतर आयुष्याची पुढील वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रातच कार्यरत राहण्याचा मनोदय मावळत्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केला आहे. स्टेट बँकेच्या पहिल्या महिलाध्यक्षा राहिलेल्या भट्टाचार्य यांनी मात्र यापुढे बँकिंग क्षेत्रात कार्य न करण्याची इच्छाही प्रदर्शित केली आहे.

गेल्या चार वर्षांपासून स्टेट बँकेत अध्यक्षा असलेल्या अरुंधती भट्टाचार्य या शुक्रवारी निवृत्त झाल्या. यानिमित्ताने मुख्यालयात आयोजित निरोप समारंभात त्यांनी वरील मत व्यक्त केले. भट्टाचार्य यांच्याकडील पदभार बँकेतील विद्यमान व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार हे शनिवारपासूनच स्वीकारणार आहेत.

स्टेट बँकेतील कारकीर्दीबरोबरच आपण आपल्या बँकिंग क्षेत्रातील कामगिरी आता थांबवत असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र वित्तीय सेवा क्षेत्राशी संबंधित अन्य व्यवसायांत आपण यापुढेही कार्यरत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपदाची तीन वर्षांची कारकीर्द संपण्यापूर्वीच भट्टाचार्य यांना वर्षभर मुदतवाढ मिळाली होती. निवृत्तीच्या ६०व्या वर्षांबाबत त्यांनी यावेळी ‘हे खूपच लवकर होते आहे, नाही!’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा उमटला.

भट्टाचार्य यांच्या कालावधीत भारतीय महिला बँक व सहयोगी पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण अस्तित्वात आले. त्याचबरोबर बँक जगातील आघाडीच्या पहिल्या ५० बँकांमध्ये समाविष्ट झाली. फोर्ब्सच्या गेल्या वर्षांच्या यादीत भट्टाचार्य या २५ व्या व्यावसायिक महिला म्हणून गणल्या गेल्या.

२०० वर्षे जुन्या स्टेट बँकेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्यासह बँकेच्या २४ व्या अध्यक्षा ठरल्या. वाढत्या बुडीत कर्जाची समस्या भेडसावणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत स्टेट बँकेचा अनुत्पादित मालमत्ता प्रमाण कमी करण्यावरील भर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वनिर्णयामुळे कायम राहिल्याचे मानले जाते. बुडीत कर्जे वसुलीसाठी संबंधित कंपन्यांविरोधातील कारवाईची प्रक्रिया स्टेट बँकेने घेतलेल्या पुढाकारामुळेच गती घेऊ शकतील, असे स्टेट बँक वर्तुळातील बडे अधिकारीही मान्य करतात. त्याचबरोबर स्टेट बँकेच्या खातेदार, ग्राहकांना तंत्रस्नेही पर्याय उपलब्ध करून देताना खासगी बँकांना टक्कर दिली. ‘सीआरआर’सारख्या मुद्दय़ावरून त्यांनी प्रसंगी रिझव्‍‌र्ह बँकेवरही तोंडसुख घेतले.

साहित्य विषयातील पदवीधर असलेल्या भट्टाचार्य या १९७७ मध्ये स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाल्या. स्टेट बँक समूहात जवळपास चार दशके त्यांनी विविध जबाबदारी हाताळली. यामध्ये भांडवली बाजाराशी संबंधित, सर्वसाधारण विमा, निवृत्त निधी आदी व्यवसायांचा समावेश आहे. २०१० मध्ये त्या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक बनल्या व २०१३ मध्ये बँकेच्या अध्यक्षा झाल्या.

First Published on October 7, 2017 5:33 am

Web Title: arundhati bhattacharya retires as sbi chairman