रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. राजन यांची गव्हर्नर म्हणून सप्टेंबरमध्ये मुदत संपत आहे. तर भट्टाचार्य या अध्यक्षा म्हणून स्टेट बँकेतून त्याच महिन्यात निवृत्त होणार आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी त्या नियुक्त झाल्यास मध्यवर्ती बँक स्थापनेच्या इतिहासात त्या पहिल्या महिला गव्हर्नर बनतील. यापूर्वी डेप्युटी गव्हर्नरपदाला महिला नेतृत्व लाभले आहे. याचबरोबर रिझव्‍‌र्ह बँकेशी संबंधित तीन व्यक्तींची नावेही चर्चेत आहेत. डॉ. ऊर्जित पटेल, डॉ. सुबीर गोकर्ण व राकेश मोहन हे ते तिघे आहेत. पैकी गोकर्ण व मोहन हे मध्यवर्ती बँकेचे डेप्युटी गव्हर्नर राहिले आहेत. तर पटेल सध्या या पदावर आहेत. केंद्र सरकारमधील वरिष्ठ पातळीवरील शक्तिकांता दास व अरविंद सुब्रमण्यन यांचीही नावे रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत सध्या आहेत.

१. अरुंधती भट्टाचार्य, स्टेट बँकेच्या अध्यक्षा
२. डॉ. सुबीर गोकर्ण, माजी डेप्युटी गव्हर्नर
३. शक्तिकांता दास, विद्यमान अर्थ व्यवहार संचिव
४. डॉ. ऊर्जित पटेल, रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर
५. राकेश मोहन, माजी डेप्युटी गव्हर्नर
६. अरविंद सुब्रमण्यन, मुख्य आर्थिक सल्लागार