News Flash

विकासदर फुगवटय़ाच्या सुब्रमणियन यांच्या दाव्याने खळबळ

मुद्देसूद प्रतिवादासह खंडनाची केंद्र सरकारकडूनही सज्जता

मुद्देसूद प्रतिवादासह खंडनाची केंद्र सरकारकडूनही सज्जता

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने बुधवारी देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी शोध निबंधाद्वारे भारतात आर्थिक विकासदराची आकडेवारी २.५ टक्क्य़ांनी फुगविण्यात आल्याचा केलेला दावा फेटाळून लावताना, त्याचा मुद्देसूद प्रतिवाद योग्य वेळी केला जाईल, असे बुधवारी स्पष्ट केले.

विकासदराच्या मापनाचा मुद्दा हा सुयोग्य विद्वत वादविवादाचा असताना, त्या संबंधाने सनसनाटी दावे करण्याचा प्रयत्न अत्यंत खोडसाळ आहे. खुद्द सुब्रमणियन कालपर्यंत ज्या प्रणालीचा घटक होते त्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या प्रतिष्ठा आणि गुणवत्तेला यातून बट्टा लावला जात आहे, हा मुद्दाही पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने पुढे आणला आहे.

मापनाची पद्धती बदलल्यामुळे आर्थिक वर्ष २०११-१२ आणि २०१६-१७ दरम्यान विकास दर २.५ टक्क्य़ांनी जास्त दाखवला गेला, असा दावा मोदी सरकारमध्ये मागील वर्षांपर्यंत माजी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले सुब्रमणियन यांनी  संशोधन निबंधाद्वारे केला आहे. हार्वर्ड विद्यापीठात प्रसिद्ध केल्या गेलेल्या या संशोधन निबंधाच्या आधारे त्यांनी लिहिलेला लेख ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाला आहे. या लेखातील दाव्यांमुळे देशाच्या अर्थजगतात खळबळ माजली असून, देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याची चिंता ताजी असतानाच पुढे आलेल्या अहवालाची त्यामुळे मोदी सरकारला गंभीरपणे दखल घेणे भाग पडले आहे.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने प्रतिक्रिया म्हणून काढलेल्या पत्रकात, विकास दर मापनासाठी २०११-१२ हे आधारभूत वर्ष म्हणून मानले जाण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला गेला नसून, अनेक तज्ज्ञ समित्यांच्या शिफारसीअंतीच तो घेतला गेला असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर जानेवारी २०१५ पासून मापन पद्धतीतील बदल अंमलात आणला गेला. खुद्द सुब्रमणियन यांनी स्वत:च कबुली देताना, मापन पद्धती व परिणामी निष्कर्षांबाबत ते ‘अद्याप अनिश्चित’ आहेत असे म्हटले आहे. तरीही शोध निबंधामध्ये त्यांनी केलेल्या दाव्याची तपशीलवार तपासणी करून योग्य वेळी मुद्देसूद खंडणी करणारे उत्तर दिले जाईल, असे आर्थिक सल्लागार परिषदेने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2019 1:08 am

Web Title: arvind subramanian economy of india
Next Stories
1 बँकांमध्ये ११ वर्षांत घोटाळेबाजांकडून २.०५ लाख कोटी रुपये फस्त
2 बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत रघुराम राजन
3 प्रवासी वाहन विक्रीला घरघर
Just Now!
X