News Flash

समभागांचे मूल्यांकन अर्थव्यवस्थेच्या वाढीशी अनुरूप हवे!

बाजारातील संभाव्य उलटफेर होऊन, सध्या दिसत असलेला नफा धुऊन निघेल, असा इशारा त्यांनी दिला.

| January 31, 2018 02:25 am

अरविंद सुब्रमणियन यांचा गुंतवणूकदारांना ‘सावधगिरी’चा इशारा

भांडवली बाजारात शिखरस्थानी पोहोचलेले समभागांचे मूल्यांकन हे काळजी वाटण्याजोगे आहे आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे त्याला पाठबळ नसल्यास कोणत्याही क्षणी त्यात मोठी घसरण संभवू शकते. त्यामुळे ‘अतीव दक्षता’ आवश्यक आहे, असा इशारा देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी दिला.

आगामी आर्थिक वाटचालीबद्दल आश्वासक आशावाद असला तरी चालू आर्थिक वर्षांत आर्थिक विकास दर ६.७५ टक्क्यांवर म्हणजे आधीच्या २०१६-१७ मधील ७.१ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत कमीच असण्याची शक्यता आहे, याकडे सुब्रमणियन यांनी लक्ष वेधले.

सुब्रमणियन यांनी तयार केलेला वर्ष २०१८-१९ साठी अर्थसंकल्पपूर्व आर्थिक पाहणी अहवाल सोमवारी संसदेत सादर करण्यात आला. या पाश्र्वभूमीवर या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी भारताच्या आणि अमेरिकेच्या भांडवली बाजारात गेल्या दोन वर्षांपासून चढाओढ सुरू असल्याचे सांगितले. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांची मार्गक्रमणा मात्र वेगवेगळ्या वाटेने सुरू आहे, मात्र भांडवली बाजाराच्या मूल्यांकनाचा महत्त्वाचा निकष म्हणजे किंमत/ उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) हे उभय बाजारांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये एकसमान पातळीवर आहे, या विसंगतीवर सुब्रमणियन यांनी बोट ठेवले.

बाजाराचे मूल्यांकन सद्य पातळीवर कायम राखायचे तर एकूण अर्थव्यवस्था आणि कंपन्यांची मिळकतही अपेक्षेनुरूप वाढायला हवी. गुंतवणूकदारांनी भागभांडारातही आवश्यक ते फेरबदल वेळोवेळी करायला हवेत. अन्यथा बाजारातील संभाव्य उलटफेर होऊन, सध्या दिसत असलेला नफा धुऊन निघेल, असा इशारा त्यांनी दिला.

आर्थिक सर्वेक्षणातील वृद्धीपूरक आशावादाने सोमवारी सेन्सेक्स २३३ अंशांनी वधारून, नव्या ऐतिहासिक उंचीवर पोहोचला होता. तर मंगळवारी जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि नफावसुली झाल्याने निर्देशांकाने २४९ अंशांनी गडगडला आहे. आर्थिक पाहणी अहवालाने अर्थव्यवस्थेने गती पकडण्यासह २०१८-१९ मध्ये विकास दर ७.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा आशावाद व्यक्त केला आहे.

प्रत्यक्ष आर्थिक सर्वेक्षणातही, व्यापक अर्थव्यवस्थेला असलेले जोखीम घटक, धोरणात्मक सजगतेबाबत गंभीर दखल आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मुख्यत: आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीतील वाढ अशीच सुरू राहिल्यास, कमालीच्या उंचावलेल्या समभागांच्या किमतीत मोठी घसरण आणि देशात सुरू असलेल्या भांडवलाच्या ओघात अकस्मात ओहोटीच्या परिणामांबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे.

आपण हे भाष्य काही अंतर्गत माहिती हाती लागल्याने केले आहे असा याचा अर्थ यातून काढला जाऊ नये, असेही सुब्रमणियन यांनी स्पष्ट केले. गेल्या २०० वर्षांतील इतिहासाकडे पाहिल्यास, वाजवीपेक्षा जास्त किमत वाढलेल्या कोणत्याही मालमत्ता वर्गात अकस्मात मोठी घसरण दिसणे अपरिहार्यच आहे. मात्र समभाग बाजाराचे सद्य मूल्यांकन या अधिक काळ तग धरून राहतील की त्या अल्पजीवी ठरतील, याचे उत्तर अनेक पैलू पाहून मिळविले जायला हवे, असे आपल्याला वाटते हेही त्यांनी स्पष्ट केले.

सद्य मूल्यांकन शाश्वत आहे काय?

भारतीय भांडवली बाजार निर्देशांकांनी जगातील अनेक प्रमुख बाजारांच्या निर्देशांकांना मात देणारी कामगिरी केली आहे. डिसेंबर २०१५ पासून निफ्टी ४५ टक्क्यांनी तर सेन्सेक्स ४६ टक्क्यांनी वधारला आहे. डॉलरच्या परिमाणात सेन्सेक्सची वाढ ५२ टक्क्यांचा परतावा देणारी ठरते. यातून भारतीय भांडवली बाजाराचे किंमत / उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) हे अमेरिकी बाजाराइतकेच २६ पट अशा उच्च पातळीवर गेले आहे. दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये मोठा फरक असताना, त्यांची सद्य वाटचालही एकसारखी नसताना मूल्यांकन एकसारखे राहावे यामागे तार्किक कारण दिसून येत नाही, असे सुब्रमणियन म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2018 2:25 am

Web Title: arvind subramanian warns investors indian economy
Next Stories
1 करदात्यांचा विस्तार, बचतीत वाढ
2 ‘नकोशा’ मुली  २ कोटी १० लाख
3 पायाभूत सुविधांसाठी ४.५ हजार अब्ज डॉलरची गरज
Just Now!
X