मुंबई : पहिल्या करोना लाटेतील टाळेबंदीपश्चात अर्थचक्र सुरू झाल्यावर म्हणजे जून २०२० ते जून २०२१ या कालावधीत ‘ट्रेड्स’ या इलेक्ट्रॉनिक व्यासपीठावर, ‘एम१एक्स्चेंज’च्या माध्यमातून ७,०५५ कोटींचे वित्तसाहाय्य सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएसएमई) उद्योगांना पुरविण्यात आली. मागील आर्थिक वर्षात २०२०-२१ टे्रड्स व्यासपीठाने अंदाजे रु. १७,२०० कोटींचे व्यवहार केले. २०१७ मध्ये या व्यासपीठाची स्थापन झाल्यापासून ३९,००० कोटी रुपयांची रक्कम पुरविण्यात आली आहे.

एमएसएमई उद्योगांना त्यांच्या उत्पादन-सेवांसाठी सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह, खासगी क्षेत्र व इतर खरेदीदारांकडून देणी थकतात किंवा विलंबाने चुकती केली जातात. तथापि, त्या थकीत प्राप्तीच्या मोबदल्यात, एमएसएमईंना निधी पुरविण्यासाठी आणि बँकांना प्राधान्य क्षेत्र कर्ज देण्याच्या जबाबदारीची पूर्तता करण्यासाठी २०१७ साली कार्यरत झालेले टे्रड्स हे इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ असून, बँकांमध्ये ते लोकप्रियही बनले आहे. हे व्यवहार सुलभ करणारा बँका व लघुउद्योजकांतील दुवा म्हणून एम१एक्स्चेंज कार्य करते.

एम१एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदीप मोहिंद्रू यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-जून तिमाहीत एम१एक्स्चेंजने तिच्या व्यासपीठावरून ३७ बँकांकडून २,००० कोटी उभारण्यासाठी एमएसएमईंना मदत केली आहे. टे्रड्स मंचाच्या माध्यमातून वित्तपुरवठ्यासाठी खासगी कंपन्या लघुउद्योगांना मदत करताना दिसत आहेत, असेही मोहिंद्रू यांनी नमूद केले.