मोदी सरकारच्या कामगिरीला अ‍ॅसोचेमने १० पैकी सात गुण दिले आहेत, सरकारला वर्ष पूर्ण होत असताना अ‍ॅसोचेमने हे मूल्यमापन केले आहे. कराबाबतचे प्रश्न व उद्योग सुरू करण्यात सुलभतेचे वातावरण यात सरकारने आणखी काही करणे गरजेचे आहे असे या संस्थेने म्हटले आहे, स्थूल आर्थिक स्थिती गेल्या वर्षांच्या तुलनेत बदलली आहे. चलनवाढ कमी झाली आहे. चलनात स्थिरता आली आहे व आर्थिक बाजारपेठा आकर्षक बनत आहेत असेही सांगण्यात आले.
एनडीए सरकारने कराचे प्रश्न, एफआयआयचे प्रश्न, पूर्वलक्ष्यी दायित्वे, पायाभूत सुविधा, उद्योग सुरू करण्यास सुलभतेचे वातावरण यात लक्ष घालणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. दोन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था नवीन सरकार आल्याने एक दम जगाशी एकात्म होऊन मोठा आर्थिक वाढीचा दर गाठेल, अशी अपेक्षा उद्योग व इतर विश्लेषकांनी करणे योग्य नाही असे असले तरी सरकार गांभीर्याने काम करीत आहे, गुंतवणूक क्षेत्रात पुनरूज्जीवन दिसत आहे, कायद्यात बदल होत आहेत, ग्राहकांची मागणी वाढत आहे त्यामुळे आर्थिक विकास दर वाढण्यास अजून २४-३० महिन्यांचा कालावधी लागेल, तरीही जागतिक बाजारपेठांवर बरेच काही अवलंबून असेल असे अ‍ॅसोचेमचे म्हणणे आहे.
सरकारची सुरुवात चांगली झाली आहे, वस्तू व सेवा करावर वेगाने हालचाली आवश्यक आहेत व विश्वास निर्माण करणारे संकेत बाजारपेठांना गेले पाहिजेत, मोदी सरकारच्या कामगिरीचा विचार करता आम्ही १० पैकी सात गुण देऊ असे संस्थेचे अध्यक्ष राणा कपूर यांनी सांगितले. सरकारने संसद चागंली चालवली आहे, काही अवघड कायदे मंजूर केले आहेत, थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे, संरक्षण क्षेत्रात ४९ टक्के गुंतवणुकीला मान्यता दिली आहे या जमेच्या बाबी आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असून कारभारात पारदर्शकता आली आहे, कोळसा व स्पेक्ट्रम लिलाव यशस्वीपणे पूर्ण केले असून त्यात केंद्र व राज्यांना तीन लाख कोटी मिळाले आहेत असे असले तरी उत्पादनासाठी देशातील वातावरण अनुकूल नाही.
वस्तूंच्या निर्यातीत घसरण होत आहे, त्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करायला हव्यात असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांनी देशाच्या आर्थिक राजनैतिकतेत मोठी भर टाकली आहे अशा शब्दांत कपूर यांनी मोदींचे कौतुक केले. शून्य शिल्लकीची योजना असतानाही १४ कोटी गरिबांनी जनधन योजनेत खाती उघडली व त्यामुळे १४ हजार कोटी रुपये बँकिंग प्रणालीत आले असे सांगून ते म्हणाले की, कृषी क्षेत्रातील पेचप्रसंग चिंताजनक आहे कारण मान्सूनचा पाऊस पुरेसा होणार नाही असा अंदाज आहे. शिवाय बेमोसमी पावसाने शेतीचे नुकसान केले आहे.