अवघ्या १५ सेकंदात खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या दोन तरुण उद्योजकांच्या ‘अॅस्ट्रोनॉट फूड’च्या १५० दालनांची साखळी भारतात सुरू होणार आहे. त्याचबरोबर कंपनीने विमान तसेच रेल्वेतही हे खाद्यपदार्थ पुरविण्याचे निश्चित केले असून विदेशात आपल्या आप्तांना हे खाद्यपदार्थ पाठविण्याचाही संकल्प सोडला आहे.
पावभाजी, गाजर हलवा, बटाटे वडय़ाची भाजी, उपमा, किंवा कोणताही खाद्यपदार्थ तयार करायचा म्हटला तर त्यात बराच वेळ खर्ची पडतो. पण पंधरा सेकंदात पावभाजी, गाजर हलवा, उपमा, बटाटेवडय़ाची भाजी आणि अन्य पदार्थ तयार करणारी यंत्रणा संदीप भालेराव आणि सचिन गोडबोले यांनी प्रत्यक्षात आणली आहे.
‘फ्रिजव्हर्ड आणि ड्राईंग’ या तंत्रज्ञानातून हे पदार्थ तयार करण्यात आले असून प्रत्येकी ३० ग्रॅमच्या पाऊचमध्ये कच्च्या स्वरुपातील हे पदार्थ आम्ही बाजारात विक्रीस आणले असल्याचे सांगून गोडबोले व भालेराव म्हणाले की, भांडय़ात हे मिश्रण काढून त्यात फक्त गरम पाणी टाकले की तो पदार्थ खाण्यास तयार करता येतो. या पद्धतीत गॅस, मायक्रोवेव्ह याची गरज नाही.
शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी किंवा घरापासून राहणारी मंडळी, हायकर्स व ट्रेकर्स यांच्यासह गृहिणींनाही घरी हे पदार्थ झटपट तयार करता येतील. ‘अॅस्ट्रोनॉट फूड’च्या माध्यमातून हे पदार्थ फक्त पंधरा सेकंदात तयार करण्यात येणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
कंपनीने जेट एअरवेजबरोबर करार केला असून त्यांच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानात हे पदार्थ मिळू शकतील; तसेच व्यावसायिक भागीदारीसाठी भारतीय रेल्वेबरोबरही आमची बोलणी सुरू आहे, असे या दोघांनी सांगितले.
येत्या दीड ते दोन वर्षांत संपूर्ण भारतात या ‘अॅस्ट्रोनॉट फूड’ची किमान १५० दुकाने सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच या तंत्राने तयार करून परदेशात पाठविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गोडबोले व भालेराव यांनी सांगितले.