तवानस्थित आसुसने नेटबुकमधील नवी श्रेणी बुधवारी नवी दिल्ली सादर केली. या वेळी कंपनीच्या दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख पीटर चॅन्ग उपस्थित होते. नव्या नेटबुकची किंमत १४,९९९ रुपये आहे.
चालू वर्षांत ५० हजार नेटबुक विक्रीचे उद्दिष्ट या वेळी जाहीर करण्यात आले. या माध्यमातून तैवान हा देश या क्षेत्रात पुन्हा आपले स्थान स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.
२००७ ते २०११ नंतर रया गेलेल्या नेटबुकला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या नव्या उत्पादनाद्वारे होत असल्याचा दावा या वेळी चॅन्ग यांनी केला. कंपनीच्या एकूण उत्पादनांच्या तुलनेत या क्षेत्रातील उत्पादनांचा हिस्सा १० टक्के असेल, असेही ते म्हणाले. या श्रेणीत येत्या काही महिन्यांमध्ये आणखी उत्पादने सादर केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
ईबुक एक्स२०५ नावाच्या या नेटबुकचे वजन एक किलोपेक्षाही कमी असून त्याचा आकार ११.६ इंच आहे. यात विण्डोज ८.१ प्रणाली असून अ‍ॅटम क्वाटकोअर प्रोसेसर आहे. तूर्त हे नेटबुक फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘मॅट’ या संगणक व तत्सम उपकरणांविषयी माहिती ठेवणाऱ्या संस्थेने गेल्या आर्थिक वर्षांत नोटबुक आणि नेटबुक यांची मागणी ६८.४० लाख राहिल्याचे म्हटले आहे.