सध्याच्या अस्थिरतेने भारलेल्या काळात गुंतवणूक करताना, अधिक परताव्यासाठी अधिक जोखीम अशा धाटणीचे गुंतवणुकीचे धोरण न ठेवता, सर्वाधिक प्राधान्य हे गुंतवणूक मूल्य शाबूत राखण्याला असायला हवे, असा कानमंत्र मंगळवारी आयोजित ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या वेबसंवादातून गुंतवणूक नियोजनकार तृप्ती राणे यांनी दिला.

एका बाजूला तेजीमय आशावाद तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेच्या ढासळण्याला गती देणाऱ्या करोना कहराने निर्माण केलेली संभ्रमावस्था, अशा सध्याच्या विचित्र अवस्थेबद्दल ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ वेबसंवादाला मोठय़ा संख्येने हजेरी लावणाऱ्या गुंतवणूकदार वाचकांनीही तृप्ती राणे यांना त्यांच्या मनातील प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व संवादाची भूमिका सचिन रोहेकर आणि सुनील वालावलकर यांनी निभावली.

करोनाकाळात नोकर कपात, वेतन कपात यामुळे कुटुंबाच्या मिळकतीवर परिणाम झाला असला तरी गुंतवणुकीची कास कायम ठेवणे अत्यावश्यक आहे. गुंतवणुकीतून योग्य समयी नफा कमावून घेणे तितकेच महत्वाचे आहे.  कमावलेला नफा हा जोखमीबाबत दक्ष गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांकडे वळवून गुंतलेल्या भांडवलाला सुरक्षित करणे सध्याच्या काळात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

उदाहरणादाखल असे गुंतवणुकीचे अन्य पर्याय म्हणजे लिक्विड फंड, शॉर्ट टर्म फंडांचा विचार करता येईल. तात्पुरत्या कालावधीसाठी पैसा राखून ठेवायचा झाल्यास बँकांच्या मुदत ठेवी आणि पोस्टाच्या योजनाही विचारात घेता येतील. कुटुंबाच्या मिळकतीतील तूट अशा तऱ्हेने भरून काढून खर्च भागविला जायला हवा, असे त्यांनी सुचविले. सोन्यामध्ये गुंतवणूक ही दागिन्यांच्या स्वरूपात न करता, म्युच्युअल फंडांच्या ‘गोल्ड ईटीएफ’ योजना अथवा सार्वभौम सुवर्ण रोखे यांसारख्या पर्यायांचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.

गुंतवणूक ही थेट समभागांमध्ये असो अथवा म्युच्युअल फंडांमार्फत समभागांशी निगडित ‘एसआयपी’मध्ये केलेली असो, पूर्वनिर्धारित आर्थिक उद्दिष्टांनुरूप ती विनाखंड सुरूच ठेवली पाहिजे. मात्र अवास्तव परताव्याची हाव टाळून, योग्य समयी नफा कमावून घेणे तितकेच महत्वाचे आहे.