१.२५ लाख एटीएमच्या कार्यान्वयनाचा बेत
देशभरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये बँकांची एटीएम आणि मायक्रो एटीएम कार्यान्वित करण्याचे काम वेगाने सुरू असून, अगदी दुर्गम खेडय़ांतही झटपट रोख रक्कम मिळवून देणारी ही यंत्रे सुरू केली जातील, असे केंद्र सरकारकडून शुक्रवारी लोकसभेत सांगण्यात आले.
देशातील सर्व १.२५ लाख टपाल कार्यालयांमध्ये एटीएमच्या सुसज्जतेचे काम सुरू आहे, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी लोकसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील नोकरभरतीच्या अनुशेषाबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नावर त्यांनी, हंगामी स्वरूपात सेवेत सामावून घेतलेले ‘बँकमित्र’ हे अपुरा कर्मचारी वर्ग असलेल्या शाखांमधून ग्राहकांना सेवा देण्यास मदत करीत आहेत, असे उत्तर दिले.