देशात बँकेत खाते नसलेल्यांनाही एटीएमचा वापर मोबाईल तंत्रज्ञान वापरून रोख रक्कम मिळविण्यासाठी शक्य करणारी सुविधा लवकरच खुली केली जाईल, असे गव्हर्नर डॉ. राजन यांनी बुधवारी येथे बोलताना स्पष्ट केले. सध्याच्या घडीला केवळ बँकेत खात्याबरोबरीने मिळणाऱ्या एटीएम कार्ड बाळगणाऱ्या धारकांनाच ही सुविधा शक्य आहे. ज्यांचे कोणत्याही बँकेत खाते नाही अशा आप्तस्वकीयांसाठी बँक खातेधारकांकडून एटीएममार्फत पैशांचे हस्तांतरण शक्य करणाऱ्या प्रणालीला आपण तत्त्वत: मंजुरी दिली असल्याचे डॉ. राजन यांनी स्पष्ट केले. या प्रणालीत पैसे धाडणाऱ्याने त्याच्या खात्यातून विशिष्ट रक्कम ही इच्छित व्यक्तीला एटीएमद्वारे प्राप्त होईल, अशी गरज पूर्ण केली जाईल. या प्रक्रियेसाठी मध्यस्थ नियुक्त केले जातील, जे पैसे प्राप्त करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल फोनवर विशिष्ट संकेतांक पाठवतील आणि त्या आधारे नजीकच्या कोणत्याही एटीएम केंद्रात रोख रक्कम मिळविली जाऊ शकेल. या संबंधाने ग्राहकाची अस्सलता, ओळख, उलाढालीची वैधता, तत्परतेच्या दक्षता वगैरे सुरक्षाविषयक बाबींची समर्पक काळजी घेणाऱ्या नावीन्यपूर्ण उत्पादनांची तातडीने गरज असून, या कामी नासकॉमच्या तंत्रज्ञांकडून मदतीचे आवाहनही त्यांनी केले.
‘देयक बँके’बाबत निर्णय अद्याप नाही
छोटय़ा व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरेल अशा देशातील पहिल्या पेमेंट्स अर्थात देयक बँकेच्या स्थापनेसंबंधाने अद्याप काहीही निर्णय झालेला नसून, यासंबंधाने अनेक पैलू सध्या विचारात घेतले जात असल्याचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नचिकेत मोर समितीची पेमेंट्स बँकेच्या स्थापनेची शिफारस ही किफायती व सार्वत्रिक देयक व निधीच्या हस्तांतरण प्रणालीच्या दिशेने एक पाऊल निश्चितच असल्याचे डॉ. राजन यांनी सांगितले.
फसव्या ई-मेल्सपासून सावधान..
‘‘रिझव्‍‌र्ह बँक पैशांचे वाटप करीत नसते’’
रिझव्‍‌र्ह बँकेकडून मोठी रक्कम वाटली जात असल्याचे ई-मेल संदेश कोणालाही धाडले जात नसून, आपले नाव वापरून होणाऱ्या या फसवणुकीच्या प्रकारापासून लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी बुधवारी केले. अशा ई-मेल्सना फसून कोणीही आपल्या बँक खात्यांचा तपशील देऊ नये, रिझव्‍‌र्ह बँक अशा पद्धतीने कोणालाही पैशांचे वाटप करीत नाही, असे डॉ. राजन यांनी येथे आयोजित ‘नासकॉम’च्या परिषदेत बोलताना कळकळीने सांगितले. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या व धोकेबाज प्रकारांच्या बंदोबस्तासाठी जनमाध्यमांचेच व्यासपीठ वापरण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. ‘‘हे सर्व अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. काहीही निश्चित योजण्यात आलेले नाही. कदाचित नासकॉमच्या मंडळींची याकामी आम्हाला मदत होईल,’’असे नमूद करीत आगामी काळात जनमाध्यमांचा वापर करून अनेक गोष्टी करता येण्यासारख्या असल्याचे डॉ. राजन यांनी सूचित केले. बँकांचे ‘आपले ग्राहक जाणा’ अर्थात केवायसी नियमनाच्या सुलभीकरणासाठी माहिती-तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरेल. सध्याच्या घडीला बँकांकडून या नियमांचे कठोरपणे होणारे पालन हे अनेकांना बँकिंग सेवेपासून वंचित राखणारा परिणाम साधत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.