विविध बँकांच्या एटीएममधील सध्याच्या नोटांच्या खडखडाटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर हल्ला कारणीभूत नाही, अपुरा रोकड पुरवठा तसेच तंत्रज्ञान अद्ययावततेकरिता बँकांकडून एटीएम बंद ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सायबर हल्ल्यामुळे भारतातील काही भागांतील वित्त व्यवस्था प्रभावित झाल्याची प्रकरणे मंगळवारी दाखल झाली आहेत. मात्र एटीएममध्ये रोकड नसणे व एटीएम बंद असणे याचा या हल्ल्याशी संबंध नसल्याचे सांगितले जाते. अनेक एटीएम हे तांत्रिक अद्ययावततेकरिता बंद असल्याचे सांगण्यात येते. ही क्रिया नित्याची असल्याचेही सांगितले जाते. मात्र या सायबर हल्ल्यानंतर एटीएमची विण्डोज एक्सपी प्रणालीकरिता ते बंद आहेत अथवा नाही, हे कळू शकले नाही. देशभरातील २.२० लाख एटीएमपैकी अधिकतर एटीएम हे जुन्या विण्डोज एक्सपी तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर हल्ल्यानंतर बँकांना सावधगिरीचा इशारा देताना रिझव्‍‌र्ह बँकेने एटीएमही अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रशिया, ब्रिटन आदी ठिकाणी मायक्रोसॉफ्टची विण्डोज प्रणाली जुनी असल्याने संगणक हॅक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतातही ही प्रणाली अद्ययावत करण्याच्या सूचना बँकांना शाखेतील तसेच एटीएम व्यवहाराकरिता दिल्या गेल्या होत्या. त्यामुळे ही प्रक्रिया आता सुरू झाल्याचे कळते. परिणामी, रोकड मिळण्यात आता अधिक अडचण कार्डधारकांना होणार आहे.

वान्ना क्राय रॅन्समवेअरचा फटका शुक्रवारपासून १०० हून अधिक देशांना बसला आहे. भारतात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच केरळच्या काही भागात फसवणुकीचे प्रकार घडले असले तरी ते पूर्णत: या आंतरराष्ट्रीय सायबर हल्ल्यामुळे झाले नाहीत, असा दावा केंद्र सरकारनेही मंगळवारी केला.