‘एसआयपी’ची किमया

मुंबई : म्युच्युअल फंडातील दीर्घावधीच्या उद्देशाने नियोजनबद्ध गुंतवणूक हे अनेकांगाने गुंतवणूकदारांना वरदान ठरली आहे. समभागाधारित गुंतवणुकीत ‘मल्टिकॅप’ पर्यायातील गुंतवणूक मोठय़ा अवधीत निश्चितच अपेक्षित लाभ देणारी असते. १५ वर्षांच्या अवधीत मासिक १० हजारांप्रमाणे केलेल्या १८ लाखांच्या मूळ गुंतवणुकीवर ५६.५ लाख रुपयांचा परतावा हा या गुंतवणूक पद्धतीचा नमुना आहे.

‘अर्थलाभ डॉट कॉम’कडून संकलित आकडेवारीनुसार, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल या अग्रणी म्युच्युअल फंड घराण्याच्या मल्टिकॅप फंडाने हा दमदार परतावा दिला असून, या ‘एसआयपी’ गुंतवणुकीचा प्रति वर्ष सरासरी १४ टक्के असा परतावा दर होतो. या फंडाने एक वर्ष, सात वर्षे, १० वर्षे आणि १५ वर्षे अशा सर्व कालावधीसाठी सातत्यपूर्ण चांगला परतावा दिला आहे. याच १५ वर्षे कालावधीसाठी या फंडाचा संदर्भ निर्देशांक अर्थात ‘बीएसई ५०० टीआरआय’चा परतावा दर सरासरी १२.५ टक्के असा आहे.

मल्टिकॅप धाटणीची गुंतवणूक ही सर्व प्रकारच्या बाजार आवर्तनांमध्ये आणि मुख्यत: आजच्या सारखे बाजार स्थिती दोलायमान आणि अनिश्चित कल दर्शविणारी असताना, चांगल्या परताव्यासाठी उपकारक ठरते. कारण या प्रकारच्या फंडांमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा बाजार भांडवल असलेल्या चांगल्या समभागांचा समावेश असतो आणि या तिन्ही बाजार वर्गातील समभागांमध्ये संधी आणि जोखमीचे आपापले घटक असतात. ज्यातून गुंतवणुकीचे विविधीकरण आणि जोखीम संतुलनही आपोआपच साधले जाते.