अ‍ॅमेझॉन या जागतिक स्तरावरील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीच्या आरोग्य क्षेत्रातील नव्या कंपनीची धुरा मराठमोळ्या माणसाकडे आली आहे. वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ तसेच लेखक अतुल गवांदे या कंपनीचे मुख्याधिकारी असतील.

अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझॉस, गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवे आणि जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीचे जेमी डिमॉन यांच्या कल्पनेतून नवी आरोग्य क्षेत्रातील कंपनी स्थापन झाली आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांचा अल्पखर्चिक आरोग्य निगेच्या सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने या कंपनीची स्थापना करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबतची संकल्पना उभय कंपन्यांनी जानेवारी २०१८ मध्ये सर्वप्रथम मांडली होती. औषधोपचाराच्या किमतीवर नियंत्रण आणण्याचा या कंपनीचा प्रामुख्याने भर असेल, असेही नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेतील बोस्टनमध्ये कंपनीचे मुख्यालय असेल. येत्या ९ जुलैपासून गवांदे कंपनीच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतील.

अतुल हे ‘एंडोक्रॉइन’ शस्त्रक्रियेतील तज्ज्ञ असून, ते ब्रिगहॅम अ‍ॅण्ड वुमन्स रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करतात. तसेच ते बोस्टनच्या हॉर्वर्ड टी. एच. चॅन स्कूल व हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये अध्यापनाचे काम करतात.