22 July 2019

News Flash

व्हिडीओकॉन समूहातील कंपनीचा मालमत्ता लिलाव

यूनिटी अप्लायन्सेसच्या थकीत १५३.७७ कोटी रुपयांच्या कर्जासाठी सरकारी बँकेने हे पाऊल उचलले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

थकीत १५३.७७ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीकरिता बँक ऑफ महाराष्ट्रचे पाऊल

आयसीआयसीआय बँकेने मंजूर केलेल्या विस्तारित कर्जामुळे छापेकारवाईला सामोरे जावे लागलेल्या व्हिडीओकॉन समूहातील उपकंपनीच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे पाऊल बँक ऑफ महाराष्ट्रने उचलले आहे. यूनिटी अप्लायन्सेसच्या थकीत १५३.७७ कोटी रुपयांच्या कर्जासाठी सरकारी बँकेने हे पाऊल उचलले आहे.

व्हिडीओकॉन समूहातील युनिटी अप्लायन्सेसकडे बँक ऑफ महाराष्ट्रचे जानेवारी २०१८ पासून कर्ज व व्याजासह एकूण १५३.७७ कोटी रुपये थकीत आहे. उपकंपनीचा तमिळनाडूत दूरचित्रवाणी संचनिर्मिती प्रकल्प आहे.

युनिटी अप्लायन्सेसच्या कर्जासाठी व्हिडीओकॉन इंडस्ट्रिज आणि तिचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत तसेच पी. एन. धूत हे बँक ऑफ महाराष्ट्रचे हमीदार आहेत. कर्जवसुलीकरिता बँकेने आता उपकंपनीची जागा तसेच निर्मिती सामुग्री लिलावाकरिता उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. ३० मार्च रोजी होणाऱ्या या प्रक्रियेकरिता जागा व निर्मिती सामुग्रीकरिता अनुक्रमे ४२.३४ कोटी रुपये व ७२.८२ कोटी रुपये राखीव किंमत ठरविण्यात आली आहे.

उपकंपनीविरुद्ध बँकेने यंदा दुसऱ्यांदा नोटीस काढली आहे. थकीत कर्जवसुलीसाठी असलेल्या नादारी व दिवाळखोरी संहिता प्रक्रियेकरिता रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेल्या २८ मोठय़ा कर्जखात्यांमध्ये व्हिडीओकॉनचाही समावेश आहे.

आयसीआयसीआय बँकेने विस्तारित कर्ज मंजूर केल्याप्रकरणी व्हिडीओकॉन समूह व तिच्या काही उपकंपन्यांच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाची नुकतीच छापेकारवाई झाली होती. यावेळी कंपनीच्या महाराष्ट्रातील औरंगाबाद व मुंबईतील कार्यालयातील संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. याच प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी चंदा कोचर यांचीही चौकशी करण्यात आली होती.

First Published on March 13, 2019 1:52 am

Web Title: auction company property in videocon group