23 September 2020

News Flash

राजधानीबाहेरील ‘ऑटो एक्स्पो’ला दर्दीची अलोट गर्दी

गुळगुळीत रस्ते, विना कोंडीची वाहतूक, विस्तीर्ण पटांगण, पार्किंगसाठी मोठी जागा.. हा सारा शो यंदाच्या नवी दिल्लीबाहेरच्या ‘ऑटो एक्स्पो’च्या आवारातील आहे.

| February 8, 2014 03:20 am

गुळगुळीत रस्ते, विना कोंडीची वाहतूक, विस्तीर्ण पटांगण, पार्किंगसाठी मोठी जागा.. हा सारा शो यंदाच्या नवी दिल्लीबाहेरच्या ‘ऑटो एक्स्पो’च्या आवारातील आहे. प्रगती मैदानाशी नाते तोडत यंदा प्रथमच ग्रेटर नोएडा येथे भरविण्यात आलेले ‘सिआम’ या वाहन उत्पादक संघटनेचे १२वे वाहन प्रदर्शन खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय ठरले.
तुलनेने मोठी जागा मिळाल्याने व नीटनेटक्या आयोजनाची जोड मिळालेले दर दोन वर्षांनी होणारे यंदाचे प्रदर्शन खरोखरच आगळेवेगळे आहे. मोठय़ा पटांगणावर हॉलही भव्य, त्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार, वातानुकूलित व स्वच्छ प्रकाश यंत्रणा यामुळे हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय तोडीचे असल्याचे निरीक्षण उपस्थितांनी नोंदविले.
नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील एरवीची धूळ, अव्यवस्था, अपुरी जागा, शहराच्या पाचवीला पुजलेली वाहतूक कोंडी यातून अनोखा दिलासा या प्रदर्शनाच्या रूपाने भेटकर्त्यांना मिळाला. देशविदेशातील १,१०० वाहन प्रदर्शकांना सामावून घेण्याबरोबरच प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना चांगली माहिती तंत्रज्ञानाशी संपर्क व्हावा म्हणून ग्रेटर नोएडात वाहन प्रदर्शन आयोजित करण्याचा आयोजकांचा निर्णय यशस्वी ठरला आहे. दिल्लीपासून ५० किलो मीटर अंतरावर भौगोलिकदृष्टय़ा उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या या भागातील वाहन प्रदर्शनाला ‘आम आदमी’नेही शुक्रवारी पहिल्या दिवशी अभूतपूर्व गर्दी करत पसंतीची पावती दिली. दिल्ली हे केंद्रशासित तर उत्तर प्रदेश या शेजारी राज्याला जोडणारा दिल्ली-नोएडा हा आठपदरी खड्डेविरहित रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा असलेली विविध कंपन्यांची आलिशान कार्यालये, जोडीला मॉल आणि खानपानची उपलब्धता यामुळे ग्रेटर नोएडातील या प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा मिळाल्याचे जाणवते. ग्रेटर नोएडात उभारण्यात आलेल्या ‘इंडिया एक्स्पो मार्ट’मुळे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शने आयोजित करण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध झाली आहे.
नवी दिल्लीबाहेर भरलेला यंदाचा वाहन मेळा शुक्रवारी ‘आम आदमी’साठी खुला झाला आणि मग आबालवृद्धांनी प्रदर्शनातील ‘मॉडेल’च्या छबी टिपण्यास एकच घाई केली. प्रसारमाध्यमांसाठी राखीव पहिल्या दोन दिवसानंतर आता हे प्रदर्शन येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले आहे. प्रियंका, करिना, रणबीर, जॉन अब्राहम अशी ‘बॉलीवूड’ची प्रदर्शनाला हजेरी आवर्जून दिसली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 3:20 am

Web Title: auto expo 2014 gets response
Next Stories
1 संरक्षण सामग्री व्यवसायात कल्याणी समूहाचे वाढते स्वारस्य
2 निफ्टीचे सहा हजारी मर्म मार्केट मंत्र
3 सोनी कंपनीमध्ये ५ हजार कर्मचाऱ्यांची कपात
Just Now!
X