01 December 2020

News Flash

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याची चर्चा असतानाच राजीव बजाज म्हणतात…

मुलाखतीदरम्यान वाहन क्षेत्रावर केलं मोठं वक्तव्य

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचं चक्रही थांबलं होतं. परंतु आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. तसंच जीएसटी आणि वाहन विक्री क्षेत्रात होत असलेल्या वाढीचं उदाहरणही दिलं जात आहे. दरम्यान, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी यावर भाष्य केलं. “वाहन क्षेत्रातील विक्री पुन्हा पूर्वपदावर आल्याचं म्हटलं जात आहे. परंतु गेल्या वर्षाशी याची तुलना करण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागेल,” असं मत बजाज यांनी व्यक्त केलं. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

“एप्रिल ते जून या कालावधीत थोड्याप्रमाणात वाहनांची विक्री झाली. विशेष करून दुचाकींची विक्री झाली नाही. आता हळूहळू दुचाकीची विक्री वाढच आहे. परंतु आताच या परिस्थितीची तुलना गेल्या वर्षातील विक्रीशी करता येणार आहे. जुलै महिन्यापासून पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंतच्या विक्रीची आकडेवारी पाहावी लागेल. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल,” असं बजाज यांनी नमूद केलं. “सध्या सणासुदीचा कालावधी आहे. काही ग्राहक दुचाकी खरेदी करतही आहेत. काही लोक असेही असतात जे सणासुदीच्या कालावधीत वाहन खरेदी करण्याची वाट पाहत असतात. अशातच सणासुदीच्या कालावधीत झालेल्या विक्रीची संपूर्ण महिन्याशी तुलना करणं अयोग्य ठरेल. त्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

करोना संकटामुळे दुचाकीच्या क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. परंतु त्या हिशोबानं सरकारी मदत मिळाली नसल्याचंही बजाज म्हणाले. “संपूर्ण जग हे करोनाच्या संकटात सापडलं आहे. अनेक देशांमध्ये या कालावधीत त्या त्या क्षेत्रांना सरकारकडून मदत मिळाली. परंतु आपल्याकडे तसं काहीही झालं नाही. या कालावधीत मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांवरही गदा आली. परंतु ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “दुचाकी क्षेत्राला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यानंतर चीनसोबत असलेल्या संघर्षाचाही परिणाम दिसू लागला. दुचाकीसाठी लागणारे टायर्सचा पुरवठा हा चीनमधूनच केला जातो,” असंही बजाज म्हणाले.

वाहन क्षेत्रात सर्वात मोठा फटका दुचाकी क्षेत्राला बसला आहे. ग्रामीण भागांमध्ये विक्री वाढली आहे, हे आताच सांगणं घाई ठरेल. जेव्हा आपण गेल्या वर्षीच्या विक्रीची आकडेवारी पाहतो तेव्हा हे क्षेत्र संकटात असल्याचं दिसून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच काही वाहिन्यांवर बजाज ऑटोच्या जाहिराती न देण्यावरही त्यांनी भाष्य केलं. “जे अयोग्य होत आहे ते थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हा निर्णय बजाज समुहाकडून एकत्रितपणे घेण्यात आला आहे,” असं बजाज म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 7:45 am

Web Title: auto sector driving economic revival rajiv bajaj says long way to go two wheeler sale jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 उत्पादनाला वेग
2 राज्यांना कर्जरूपी ६ हजार कोटींचे हस्तांतरण  
3 ‘रिलायन्स’च्या बाजार मू्ल्याला ६८ हजार कोटींचा फटका
Just Now!
X