गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने रोडावणाऱ्या विक्रीला सामोरे जावे लागलेल्या यंदाच्या सण-समारंभाने वाढीचा हात दिला आहे. दसरा-दिवाळी असलेल्या ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री ११ टक्क्यांनी उंचावली आहे.

‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन’ (फाडा)ने मंगळवारी जाहीर केलेल्या गेल्या महिन्यातील आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वीच्या ऑक्टोबरमधील २,२३,४९८ वाहनांच्या तुलनेत गेल्या महिन्यात २,४८,०३६ वाहने विकली गेली आहेत.
दुचाकी वाहनांची विक्री ५ टक्क्यांनी विस्तार यंदाच्या ऑक्टोबरमध्ये १३,३४,९४१ झाली आहे. तर व्यापारी वाहन विक्रीमध्ये २३ टक्के घसरण होऊन ही संख्या ६७,०६० झाली आहे. तीन चाकी वाहनांच्या विक्रीत अवघी ४ टक्के वाढ नोंदली जाऊन या गटातील ५९,५७३ वाहने विकली गेली आहेत. सर्व गटांतील वाहने मिळून ऑक्टोबरमध्ये १७,०९,६१० विक्री झाली असून वार्षिक तुलनेत त्यातील वाढ ४ टक्के आहे.

सढळ अर्थहातभाराची केंद्राकडून ग्वाही
गेल्या अनेक महिन्यांपासून विक्रीतील घसरण नोंदविणाऱ्या देशातील वाहन क्षेत्राकरिता सरकारचे अर्थसाहाय्य लाभणार असल्याचे संकेत केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहेत. लोकसभेत मंगळवारी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात जावडेकर यांनी, सार्वजनिक बँकांमार्फत दिले जाणाऱ्या ७०,००० कोटी रुपयांचा लाभ वाहन क्षेत्रालाही होईल, असेही नमूद केले.